Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआमचा लाडका कृष्णा गेला; राष्ट्रीय पक्षी मोराच्या मृत्यूने पिंपळगाव बसवंतमध्ये हळहळ

आमचा लाडका कृष्णा गेला; राष्ट्रीय पक्षी मोराच्या मृत्यूने पिंपळगाव बसवंतमध्ये हळहळ

पिंपळगाव बसवंत | पिंटू पवार

शहरातील एका वस्तीवर असलेल्या कृष्णा नामक मोराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लाडक्या असलेल्या मोराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वस्तीवरील अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. सर्वत्र मोराच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे….

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील जोपुळ रोडवर काशिनाथ विधाते व केशव बनकर यांची वस्ती आहे. याठिकाणी एक मोर होता. त्याचे नाव कृष्णा असे होते. १ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीने या मोराचे पंख उपटून काढले होते. यानंतर या मोराची तब्बेत खालावली होती.

अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या मोरावर तीन दिवसांपासून वनविभाग व वन्यजीव रक्षक यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. हे उपचार गणेश फार्म जोपुळ रोड येथील एका शेडमध्ये सुरु करण्यात आले होते.

पंख उपटून काढल्यामुळे जखमा खुप गंभीर होत्या. अखेर गुरुवार (दि 4) रोजी सकाळी सात वाजता कृष्णाची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर सर्व टिम हजर झाली. यानंतर मोराचे शवविच्छेदन करून दुपारी शिरवाडे वणी येथील वनविभागाच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णाच्या अचानक निधनाने काशिनाथ विधाते, केशव बनकर, ताराबाई धुळे यांच्यासह परीवारातील सर्वच सदस्यांना अश्रू अनावर झाले. गेल्या साडेतीन वर्षापासून सर्व परीसरात लाडका असलेल्या मोराच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दोषी असलेल्या मुख्य सूत्रधाराला कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. वनविभागाने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चिंचखेड येथील एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

लवकरच याप्रकरणी मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संजय वाघमारे वनपरिक्षेत्र अधिकारी चांदवड.देवीदास चौधरी वनपरीमंडल अधिकारी वडनेर भैरव यांनी दिली असुन सदर प्रकरणातील मुख्य आरोपी वर कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यजीव रक्षक व परीसरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या