नवीन नाशिक | प्रतिनिधी

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडी एकत्रित लढल्याचा फायदा संपूर्ण देशाने बघितला ,त्याच पार्श्वभूमीवर नाशकात येणार्या मनपा निवडणुकीत देखील महाविकासआघाडी एकत्रित लढणार असून पुढील महापौर हा 'शिवसेनेचाच ' होणार असा विश्वास शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला...

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आ. सुहास कांदे, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, महेश बिडवे उपस्थित होते.

यावेळी राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करीत ईडी व सीबीआयवर वर भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागू नका असा टोला लगावला. राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. भाजपने सर्व हत्यारे वापरले तरी महाराष्ट्र सरकारचा बाल देखील बाका होणार नाही व त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचे राऊत यांनी सांगितले.

सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पाकिस्तान किंवा चीनचा हात असल्याचे भाजपाकडून बोलले जात आहे केंद्रात संरक्षण मंत्री हे भाजपाचेच असल्याने त्यांनी सर्जिकल स्ट्राइक करावे असा सल्ला देखील राऊत यांनी दिला. आंदोलनकर्ते शेतकरी हे पंजाब व हरियाणातील शेतकरी आहेत.

केंद्राने त्यांच्यावर बळाचा वापर करून देखील आंदोलकांनी माघार घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी केंद्रसरकारने दोन पाउले मागे घेतल्यास त्यांना काही कमीपणा येणार नाही. आंदोलनाचे परिणाम हे हळूहळू देशातील वातावरण पेटतच राहिल असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांच्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की , शरद पवार हे नरसिंहराव यांच्या काळापासून पंतप्रधानपदाचे तसेच यूपीएच्या अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार होते. त्यावेळी या पदासाठी खासदारांचे मतदान घेतले असते तर 80 टक्के खासदार हे शरद पवारांच्या बाजूला असते.

आजपर्यंत महाराष्ट्रातील या दिग्गज नेत्याला डावलण्यात आल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. आगामी मनपा निवडणुकीबद्दल बोलतांना ते म्हणाले की महाविकासआघाडी एकत्रित निवडणुका लढविण्याचा प्रयोग हा पूर्णपणे यशस्वी झाल्याने मनपा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याने मुंबई व नाशिकमध्ये महापौर हा शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या जिल्हाप्रमुख पदासाठी कुठल्या प्रकारचे लॉबिंग सुरू नसून सर्वांशी चर्चा करूनच जिल्हाप्रमुख पद हे पक्षप्रमुख जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.