लाचखोरीत नाशिक अव्वल

शर्मिष्ठा वालावलकर यांची धडाकेबाज कारवाई
लाचखोरीत नाशिक अव्वल

नाशिक | फारुक पठाण | Nashik

२३ नोव्हेंबर २०२२ रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Nashik Anti-Corruption Department) अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर (Sharmistha walawalkar) यांनी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व लाचखोर यांच्या विरुध्द धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात ८६ गुन्हे दाखल करून तब्बल १२५ आरोपींना (Accused) जेरबंद करण्यात यश आले आहे...

मागील काही दिवसांमध्ये लाचलुचपत विभागाने मोठ्या माशांवर कारवाई करत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. यामध्ये जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना त्यांच्या कॉलेजरोडच्या घरी तब्बल तीस लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच हिवताप अधिकारीसह दोघांना दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या अँटी करप्शन ब्युरो हा चर्चेत आला असून शासकीय अधिकारी तसेच सेवकांमध्ये कमालीची धास्ती दिसून येत आहे.

नाशिक विभागात मागील ६ महिन्यात तब्बल ८६ लाचखोरीचे सापळे यशस्वी करून १२५ लाचखोरांना (Bribers) अटक करण्यात राज्यातील एसीबीच्या सहाही विभागात नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. तर १ जानेवारी २०२३ ते २५ मे २०२३ या काळात नाशिकमध्ये ७१ गुन्हे दाखल करण्यात येऊन तब्बल ११० आरोपी जेरबंद करण्यात आले आहे. नाशिक नंतर पुण्याचा नंबर लागतो. पुण्यात ६१ तर औरंगाबाद परिक्षेत्र ५८ सापळे यशस्वी झाले आहेत.

दरम्यान, नाशिक एसीबी विभागात जवळपास दिवसाआड कारावाई होत असून यामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. भ्रष्टाचारावर अंकुश आणण्यासाठी शासनाच्याच गृहविभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. सुरुवातीला साइडबॅच म्हणून समजल्या जाणारा हा विभाग आता आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहे. या विभागाकडून वर्षभरात वेगवेगळ्या कार्यालयात वर्ग एकपासून ते वर्ग चारपर्यंतच्या कर्मचाऱ्यांवर सापळे यशस्वी केले जात होते. अधीक्षका वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यात पथकाकडून कारवाईचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

१ जानेवारी ते २३ मे २०२३ पर्यंत कारवाईचा विभागनिहाय तक्ता (कंसात आरोपी संख्या)

नांदेड - २५ (३०)

ठाणे - ४८ (६८)

औरंगाबाद - ५८ (८१)

पुणे - ६१ (८४)

नागपूर - ३५ (५५)

अमरावती - ३६ (५३)

मुंबई -१७ (२०)

२४ तास सेवा, तक्रार करा शासकीय कार्यालयात आपल्या कामासाठी कोणीही लाचेची मागणी करत असेल स्वतः किंवा मध्यस्थीतीमार्फत तर नागरिकांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार करावी. यासाठी १०६४ हा टोल फ्री क्रमांक असून ही सेवा २४ तास सुरू असते. लाच देणे व घेणे दोन्ही गुन्हे आहेत. तक्रार करणाऱ्यांचा नाव गुप्त ठेवण्यात येतो. तशी संपूर्ण काळजी आम्ही घेतो. नागरिकांनी निर्धास्त होऊन तक्रार करावी.

शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षिका लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com