Friday, May 10, 2024
Homeनाशिकनाशिकहून बेळगावसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद; ७२ टक्के प्रवाशांनी केले 'उड्डाण'

नाशिकहून बेळगावसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद; ७२ टक्के प्रवाशांनी केले ‘उड्डाण’

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक विमानतळावरुन हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद, नाशिक अहमदाबाद,नवी दिल्ली,हैद्राबाद, बंगरुळ याबरोबरच आजपासून नाशिक बेळगांव विमान सेवा सुरु झाली आहे. नाशिकमधील वाढत्या विमानसेवेने उद्योग व पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisement -

नाशिक विमानतळ येथे स्टार एअर कंपनीच्या नाशिक बेळगांव विमान सेवेचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ.भारती पवार, एच ए एल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.शेषगिरीराव, सामान्य व्यवस्थापक ए.बी.प्रधान, दिपक सिंघल, दिंडोरी प्रांत अधिकारी संदीप आहेर, स्टार एअर कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सी.ए.बोपन्ना, उद्योजक मनिष रावल उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, नाशिक बेळगांव विमान सुरु होणे हे जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कारण या विमानसेवेमुळे गाडीपेक्षाही कमी खर्चात व कमी वेळेत प्रवाशांना बेळगांवला जाणे सोयीस्कर व आरामदायी होणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल मराठी साहित्य संमेलनास देशभरातून येणाऱ्या साहित्यिकांना देखील या विमानसेवेचा लाभ होणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक विमानतळ हे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कमी पैशात उत्कृष्ट असे तयार केलेले देशातील एकमेव विमानतळ आहे. तसेच येणाऱ्या काळात या विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

पालकमंत्री यांचे हस्ते यावेळी स्टार एअर कार्यालयाचे, चेक इन कॉऊंटरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोर्डींग पासचे अनावरण पालकमंत्र्याच्या हस्ते राधाकृष्ण झडप व सुमन झडप या दाम्पत्यांला देवून करण्यात आले.

उड्डाणे –

सोमवार, शुक्रवार, रविवार

बेळगाव प्रस्थान दु. ४.४० – नाशिक आगमन सायं. ५.४०

नाशिक प्रस्थान सायं. ६.१५ – बेळगाव आगमन सायं. ७.१५

या प्रवासासाठी एम्ब्राडर कंपनीच्या ‘ईआरजे १४५’ या विमानांचा वापर करण्यात येणार आहे. ही विमाने आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित समजली जातात. सुरुवातीला ५० आसनी विमानांद्वारे सेवा दिली जाणार असून, भविष्यात प्रवाशांच्या संख्येनुसार ती १२० आसनी होण्याची शक्यता आहे. सध्या स्टार एअरच्या वतीने अहमदाबाद, अजमेर, बेंगळुरू, बेळगाव, दिल्ली, हुबळी, तिरुपती, इंदूर, कलबुर्गी, मंबई आणि सुरतसह अकरा शहरांना सेवा दिली जाते. त्यात नाशिक बारावे डेस्टिनेशन आहे. भविष्यात आणखीही शहरांसाठी सेवा सुरू करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

संजय घोडावत ग्रुप आणि स्टार एअरला गेल्या काही वर्षांत बेळगावी आणि हुबळी भागातील लोकांकडून खूप प्रेम मिळालं आहे.  बेळगावीला अधिकाधिक भारतीय शहरांशी जोडताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यामुळे निश्चितच प्रादेशिक संपर्क वाढेल आणि यामुळे बेळगावी येथील व्यापार-उदीम व पर्यटन वाढीस चालना मिळेल.

संजय घोडावत, संचालक स्टार एअर ग्रुप

गेल्या दोन वर्षांतील कंपनीची प्रगती पाहून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. मला खात्री आहे की, आमच्यासोबत उड्डाण करणार्‍या प्रवाशांच्या प्रेमामुळे आणि पाठबळामुळे, हे व असे येणारे पुढील टप्पेही आम्ही पार करू. तसेच, आजपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित व्हॉट्सॲप ‘चॅटबोट’ सेवेची सुरुवात करत आहोत. आमचे ग्राहक आता सेवेद्वारे आमच्याशी संपर्कात राहू शकतात तसेच स्टार एअरच्या नवीनतम उपक्रमांची व ऑफरस् ची माहिती मिळवू शकतात.

सिमरनसिंग तिवाना, सीईओ स्टार एअर

- Advertisment -

ताज्या बातम्या