वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळ्याचे नियोजन

नाशिक मनपाच्या अधिकार्‍यांचा तीन दिवसांचा पहाणी दौरा
वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळ्याचे नियोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

'नमामी गंगा'च्या धर्तीवर नाशिकच्या (Nashik) 'नमामी गोदा' प्रकल्पासाठी तसेच २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळाच्या (Simhastha Kumbh Mela) दृष्टीने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिक मनपाच्या अधिकार्‍यांच्या टीमने उत्तर प्रदेशमधील वाराणसी, प्रयागराज या दोन शहरांना भेट देऊन तेथील विकासकामांची, तंत्रज्ञानाची, दळणवळण, स्वच्छता, मलशुद्धीकरण प्रकल्प यांची नोंद घेतली. तसेच 'नमामी गंगा' प्रकल्पांतर्गंत विकसित करण्यात आलेल्या काशी विश्वनाथ कॉरीडोअर, नदी काठचा विकास (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट), नमो घाट, गंगा आरती याची सविस्तर माहिती घेतली.

मनपा अधिकार्‍यांचा (officers) वाराणसी, प्रयागराज अभ्यास दौरा 'नमामी गोदा'प्रकल्प, कुंभमेळ्याच्यादृष्टीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकार्‍यांच्या टीमने दि.१४ ते १६ एप्रिल दरम्यान वाराणसी, प्रयागराज शहरांना भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली. अधिका-यांच्या या टीममध्ये मनपाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, गणेश मैड, बाजीराव माळी आणि 'नमामी गोदा' प्रकल्पाची सल्लागार कंपनी 'अलमन्डझ'चे प्रतिनिधी जितेंद्र हटवार, नाझीर हुसेन यांचा समावेश होता.

यावेळी अधिकार्‍यांनी नमो घाट, राज घाट, मणिकर्णीका, जठार घाट, भोसले घाट, सिंधीया घाट, संकठा घाट यांची पाहणी केली. तसेच शहरातील दळणवळणाची व्यवस्था सुधारण्यासाठी केलेले रस्त्याचे रुंदीकरण, दुभाजक या कामांचे विशेष कौतूक मेले. प्रदूषण कमी करण्यासाठी या शहरांमध्ये फक्त ई-रिक्षा चालवल्या जात आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने डस्टबीन, निर्माल्य कुंड यांचीही पाहणी केली. गंगा घाटाची दिवसातून तीन वेळा स्वच्छता केली जाते. निर्माल्याची विल्हेवाट लावण्याच्या पध्दतीची माहिती घेतली.

तसेच गंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी नाल्यांचे सांडपाणी अडविण्यात आणि वळविण्यात आले आहे. त्यासाठी उभारण्यात आलेल्या चारपैकी नगावा येथील ५० एमएलडीचे सिव्हेज पंपींग स्टेशन आणि रमणा येथील ५० एमएलडीचे मलशुद्धीकरण केंद्र यांना भेट देऊन त्यांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. याचबरोबर तिसर्‍या दिवशी प्रयागराजला भेट देऊन साधुग्राम ले आऊट, यमुना-गंगा संगम येथील विकास कामांची पाहणी करुन क्षेत्रीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच प्रयागराजमधील नैनी भागातील फूड चेन रीऍक्टर तंत्रज्ञानावर आधारीत मलशुद्धीकरण केंद्रात कोणत्याही प्रकारचा वास येत नसल्याचे आढळून आले.

दरम्यान, वाराणसी आणि प्रयागराजमधील चांगल्या उपक्रमांची नाशिक शहरात कशी अंमलबजावणी करता येईल याबाबत तेथील क्षेत्रीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच नदीचे पुर्नज्जीवन या मुद्याच्या दृष्टीनेही पाहाणी व चर्चा केली.राष्ट्रीय हरीत लवादाचे नियम पाळून गॅबीयन वॉल आणि दगडी बांधकाम यांचे मिश्रण करुन नमो घाट निर्माण करण्यात आलेला आहे. ही विशेष बाब अधिकार्‍यांनी या दौऱ्यात अधोरेखित केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com