
नाशिक | Nashik
आज नाशकात (Nashik) 'शासन आपल्या दारी' (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम शहरातील डोंगरे वस्तीगृह मैदानावर पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही मंत्री, खासदार, आमदारांनी हजेरी लावली आहे...
या कार्यक्रमास लाभार्थ्यांसह इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून नाशिककरांची सर्व कामे मार्गी लावली जातील. तसेच गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्याचे काम हे सरकार करणार असून या कार्यक्रमातून लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.
पुढे ते म्हणाले की, 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचा लाभ गरजू लोकांना होत असून यामधून त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. तसेच महायुतीचे (Mahayuti) सरकार हे घरोघरी जाऊन काम करत असून यात कुठलेही जातीपातीचे राजकारण केले जाणार नाही. याशिवाय नाशिक जिल्हा बँकेला (Nashik District Bank) कर्जातून लवकरच बाहेर काढणार असून नाशिकला झोपडपट्टी मुक्त करणार असल्याचे आश्वासन यावेळी अजित पवारांनी नाशिककरांना दिले.
तसेच नैतिक जबाबदारी घेऊन आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो असून येत्या अधिवेशनात राज्याच्या हिताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतले जातील, असे अजित पवार यावेळी म्हणाले.