
नाशिक | Nashik
आज नाशकात (Nashik) 'शासन आपल्या दारी' (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम शहरातील डोंगरे वस्तीगृह मैदानावर पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही मंत्री, खासदार, आमदारांनी हजेरी लावली...
या कार्यक्रमास लाभार्थ्यांसह इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थितांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) संबोधित केले.
यावेळी ते म्हणाले की, शासन आपल्या दारी लोकाभिमुख कार्यक्रम असून एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना घेता येत आहे. तसेच काही लोकांनी घरी बसून कामे केली. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवेल, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला.
पुढे ते म्हणाले की, 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम क्रांतिकारी असून या माध्यमातून आम्ही लोकांच्या हिताची कामे करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्वीकारून अजित पवार आमच्यासोबत आले असून राज्याच्या विकासाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. अडीच वर्षात अनेक विकासकामे थांबवली होती.पंरतु,आमच्या सरकारने सर्व स्पीड ब्रेकर काढून ती सर्व कामे पुन्हा सुरु केली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही तीन जण एकत्र आलो असून आम्ही समजूतदार आहोत. तसेच देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे माणूस असून ते निष्कलंकित माणूस आहेत. तर विरोधकांची वज्रमुठ सभा ही वज्रझुठ सभा ठरली आहे. त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्या त्यांच्या जागा कमी झाल्या, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटले.