नाशिककरांनो सावधान! सायबर भामटे लावतायेत 'ऑनलाईन' चुना

नाशिककरांनो सावधान!  सायबर भामटे लावतायेत 'ऑनलाईन' चुना

नाशिक । प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे वाढलेल्या ऑनलाईन व्यवहारांचा फायदा उचलत सायबर भामट्यांनी यंदा नवनवे फंडे आजमावण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 49 गुन्ह्यात 2 कोटी 3 लाख 17 हजार रूपयेऑनलाईन लंपास केले आहेत.

तर दिवाळीसह इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन दिल्या जाणार्‍या ऑफरबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे.

केंद्र शासनाने ऑनलाईन व्यवहारांवर भर दिला आहे. परिणामी नाशिकसह देशभरात गत काही वर्षापासून ऑनलाईन व्यावहार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्या बरोबरीनेच सायबर चोरट्यांचे जाळेही मजबूत झाले आहे. लॉकडाऊनमुळे सायबर चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासास व्यत्यय आल्याचा फायदा पररराज्यातील चोरट्यांना मिळाला आहे.

वेगवेगळ्या क्लृपत्या वापरून चोरटे सर्वसामान्यांच्या बँक खात्यांवर डल्ले मारतात. या वर्षी करोनामुळे देशाला लॉकडाऊनचा सामना करावा लागला. आर्थिक परिस्थिती खालावत गेल्याने सायबर चोरट्यांनी कर्ज देण्याचा बहाणा करीत सर्वसामन्यांना गंडवण्याचे काम केले.

चालु वर्षी 49 घटनांमध्ये 2 कोटी 3 लाख 17 हजार रूपये सायबर चोरट्यांनी हातोहात काढून घेतले. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, सायबर चोरीमध्ये खात्यादारांनी आपली माहिती चोरट्यांना शेअर करणे सर्वात धोकादायक असते. दुर्दैवाने सर्वसामान्य नागरिक तसे करतात.

यात उच्च शिक्षीत, वृद्ध, महिला अशा सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश असतो. ऑनलाईन खरेदीचे आमिष सुद्धा चोरट्यांच्या पथ्यावर पडते. मागील काही घटनांमध्ये देवळाली कँम्प परिसरातून बोलत असल्याचे आणि लष्करी अधिकारी असल्याचे भासवून चोरट्यांनी पैसे काढले.

वनटाईम पासवर्ड तसेच चोरट्यांकडून येणार्‍या लिंकवर नागरिकांनी क्लिक केले की बँक खात्यावर चोरट्यांचा ताबा येतो. यासाठी काही मिनीटांचा कालावधी पुरेसा ठरतो.

ऑनलाईन ऑर्डर देऊन सुद्धा चोरटे फसवतात. हॉटेल व्यावसायिक, मोठे किराणादुकानदार यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. ऑनलाईन ऑर्डर देऊन पैसे देण्याचा बहाणा करून चोरटे आपले इप्सित साधतात. ऑनलाईन पेमेंट करणार्‍या वॅलेटचा सुद्धा चोरट्यांनी यापूर्वी बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी उपयोग केला आहे.

दिवाळीसह इतर सनांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ऑफर येत असतात. तसेच खरेदी केली जाते. परंतु फसव्या ऑफर ओळखूप सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com