नाशिकची मेडिकल हबकडे वाटचाल

दिंडोरीत रिलायन्स पाठोपाठ इंडियन ऑइलची चाचपणी
नाशिकची मेडिकल हबकडे वाटचाल
USER

नाशिक । रवींद्र केडिया Nashik

रिलायन्स उद्योग ( Reliance Industries ) समुहाच्या तळेगाव अक्राळे येथील प्रकल्पासाठी 161 एकर जागा घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता नाशिकमधील औषधनिर्मिती क्षेत्राला खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे. यासोबतच नाशिक औषधनिर्मिती व वैद्यकीय सेवा क्षेत्रातील मोठे हब बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

दरम्यान,रिलायन्स पाठोपाठ इंडीयन ऑइलकडूनही ( Indian Oil ) अक्राळे येथेच 60 एकर जागेची मागणी असून, यात क्रायोजेनिक इंजिन्स आणि इतर प्लांटसाठी लागणार्‍या इंजिन्सचे उत्पादन केले जाणार आहे.

नाशिकमधील वातावरण औषधनिर्मितीसाठी पूरक आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात यापूर्वीच अनेक औषध उद्योग प्रकल्प स्थापित झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, ग्लॅक्सो स्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स, मॅक्सहेल फार्मास्युटिकल्स, डेल्टा फिनोकेम, जेनरलाइफ , कॅटाफार्मा, ब्लिस इन्फ्युजन्स अँड सर्जिकल , चैतन्य फार्मास्युटिकल्स, डी विजय फार्मा तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील होल्डन मेडिकल लॅबोरोटरीज, नेक्सिकॉम फार्मास्युटिकल्स आदी कंपन्या कार्यरत आहेत.मुबलक पाणी तसेच आवश्यक तेवढी आर्द्रता वातावरणात आहे. त्यामुळे येथील औषध निर्मिती उद्योगाला पोषक वातावरण आहे.

वातावरण औषध निर्मितीला पूरक असल्यामुळे नाशिक येथे अनेक औषध उद्योगांनी स्थापना प्रकल्प सुरू केलेले आहेत. त्यामुळे रिलायन्स सारख्या मोठ्या उद्योगाला आवश्यक असणारी मइको सिस्टम म्हणजेच आवश्यक असणारा कच्चा माल उपलब्ध होणे सहज शक्य आहे. मोठा उद्योग आल्यामुळे छोट्या पुरवठादार कंपन्यांनाही संधी उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा औषध निर्मिती क्षेत्रात मोठा हब म्हणून पुढे येणार आहे.

या उद्योगांमुळे केवळ दिंडोरी नव्हे तर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी एक मोठा उद्योग येणे अपेक्षित होते.ते आता साकारणार आहे. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातील उद्योग अनेक छोट्या पुरवठादारांना नवी संधी निर्माण करून देणारा ठरेल. एवढेच नव्हे तर औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाची घटती मागणी निश्चितपणे वाढण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

एमआयडीसीची सुमारे 525 एकर जागा आहे. तेथे वीज, पाणी आदी पायाभूत सुविधाही देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. आता रिलायन्सचा मेगा प्रोजेक्ट येत असल्याने येथील जागेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. अनेक उद्योजकांनी येथील भूखंडांसाठी चौकशी सुरू केली असल्याचे चित्र आहे.

वैद्यकीय सेवांमध्येही अग्रेसर

अनेक आजारांवर सर्व स्तरावरील इलाज नाशिकमध्ये होत आहेत रुग्णालयांची संख्या वाढत असली तरी मराठा विद्या प्रसारक मेडिकल कॉलेज अतिशय सक्षमपणे कार्य करीत आहे. त्यांच्या जोडीलाच आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय असल्याने लवकरच नाशकात गव्हर्मेंंट मेडिकल कॉलेज व गव्हर्मेंंट मेडिकल हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येणार्‍या काळात नाशिक हे उत्तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी वैद्यकीय सेवेचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

विदेशातीलही रुग्ण

वैद्यकीय सेवा सुविधांमध्ये नाशिक गेल्या काही वर्षांमध्ये अग्रेसर झाला आहे. अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून नाशकात उत्तमोत्तम उपचार पद्धती कार्यरत असून, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची संख्या झपाट्याने वाढत आहे वोक्हार्ट, सह्याद्री, अपोलो, अशोका मेडीकव्हर, साईबाबा, मॅग्नम, सिक्ससिग्मा, सुयश, वेदांत, जयराम, संजीवनी, मानवता क्युरी, शताब्दी, संदर्भ यासारख्या एक ना अनेक रुग्णालये अत्याधुनिक सेवा सुविधांनी सज्ज झाले आहेत. केवळ राज्यातूनच अथवा देशातूनच नव्हे ताश्कंदचेही रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत आहेत. रोबोटिक ऑपरेशन यंत्रणाही नाशकात कार्यरत झाली आहे.

तळेगाव अक्राळेची मागणी वाढणार

एमआयडीसीचे तळेगाव अक्राळे ह्या क्षेत्रात उद्योजक मनीष रावल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिंडोरीचे आमदार व विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन दिंडोरी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठा उद्योग आणण्यासाठी साकडे घातले. नरहरी झिरवाळ यांनी ही बाब लक्षात घेत तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपर्क साधून दिंडोरी भागात मोठा उद्योग देण्यास विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी दखल घेत उद्योगमंत्री व एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना उद्योगांची मागणी असल्यास दिंडोरी एमआयडीसीसाठी पूरस्कृत करण्याची सूचना दिली. त्या अनुषंगाने रिलायंस उद्योगाला दिंडोरी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com