Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादिवाळीत लालपरी शुभ लाभाची धनी

दिवाळीत लालपरी शुभ लाभाची धनी

नाशिक | प्रतिनिधी

यंदाच्या दिवाळीत लालपरी सुसाट धावल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे. १३ ते १७ नोव्हेंबर या सलग पाच दिवसांमध्ये एसटीने दोन हजार ५९६ फेऱ्यांच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी ६८ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे…

- Advertisement -

धनत्रयोदशी ते भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत नाशिक विभागातून लालपरीने विविध मार्गांवर सुमारे साडेसात लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वी पार पाडली.

मार्चपासून बंद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी बससेवेला अनलॉकमध्ये हिरवा कंदील मिळाला आहे.

कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी हंगामासाठी नियमित फेर्‍यांसह नाशिकहून धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी मार्गांवर ६३ जादा बसेस सोडण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केले होते.

प्रवाशांनी एसटीच्या प्रवासी वाहतूक सेवेला प्रतिसाद देत भरघोस दान दिले. त्यामुळे जुने सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी आदी बसस्थानकांमध्ये माहेरवाशिणींनी गर्दी केली होती.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने महामार्ग बसस्थानकातून मुंबई, नगर, सोलापूर, सातारा यासाठी तर ठक्कर बाजार येथून खानदेश, औरंगाबाद, पुणे या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या होत्या.

तर जुने सीबीएस बसस्थानकातून जिल्हांतर्गत मार्गावर लालपरी धावली. प्रवाशांच्या गर्दीनुसार बसेस उपलब्ध करून दिल्या जात होत्या. विशेषत: खान्देश पट्ट्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव आदी ठिकाणाच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात लालपरीला मागणी होत होती. खानदेश मार्गावरील सर्व बसेस प्रवाशांनी ओसंडून वाहत होत्या.

दरम्यान, माहेरवासिनींनी घरी परतण्यास सुरुवात झाली असून, २२ नोव्हेंबरपर्यंत जादा बसेस सुरू राहणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी शनिवारी व रविवारी प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच नियमित फेऱ्याही कायम राहणार असल्याने एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

पाच दिवसांतील एसटीचे उत्पन्न

दिनांक उत्पन्न फेऱ्या

१३ नोव्हेंबर : ४१ लाख ३२ हजार ५०३

१४ नोव्हेंबर : ३९ लाख ३५ हजार ४७२

१५ नाेव्हेंबर : ५९ लाख ०३ हजार ५३०

१६ नोव्हेंबर : ६४ लाख ९० हजार ५५०

१७ नोव्हेंबर : ६४ लाख २५ हजार ५६०

- Advertisment -

ताज्या बातम्या