सकल मराठा समाज पालकमंत्री भुजबळांवर नाराज; शरद पवारांकडे करणार तक्रार

jalgaon-digital
2 Min Read

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्याकरिता गेले होते मात्र दोन तास उलटूनही भुजबळ परत न आल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त करीत भुजबळ यांच्या विरोधी घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आज ( दि. 18 ) रोजी सकाळी 11 वाजता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ना. भुजबळ यांना निवेदन देणे करिता भुजबळ फार्म याठिकाणी येणार होते मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे भुजबळांना त्र्यंबकेश्वर येथे जावे लागले.

दरम्यान सकाळी 11 ते एक वाजेपर्यंत आंदोलकांनी भुजबळ फार्मच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला. मात्र दोन तास उलटूनही ना. भुजबळ न आल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त करत भुजबळ यांच्या विरोधात घोषणेबाजी केली व त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली. तसेच भुजबळ हे मराठा विरोधी असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथे होणारा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना मी साडे दहा वाजताच भुजबळ फार्म येथून रवाना होऊन दीड वाजेपर्यंत परत येईल असे सांगितले होते. मात्र त्यांनी वेळ बदलून येणे गरजेचे असताना माझा विरोध म्हणून राजकीय सूड घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाला माझ्यासह सर्वच पक्षांचा पाठिंबा आहे व यापूर्वी सर्व पक्षांनी इतर आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मागणी केली होती. अजूनही मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक आल्यास मी त्यांच्याशी चर्चा करीन.

छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *