पाणी
पाणी
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये होऊ शकते 'पाणीकपात'

गंगापूर धरणात अपेक्षित साठा न झाल्यास शहरवासियांवर पाणी कपातीची टांगती तलवार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरांतील सत्तर ते ऐंशी टक्के भागाची तहान भागविणार्‍या गंगापूर समुह धरण क्षेत्रात पाऊणे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

परिणामी गंगापूर धरणात आजमितीस 50 टक्के पेक्षा कमी साठा शिल्लक असुन येत्या पंधरा दिवसात गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रास समाधानकारक पाऊस न झाल्यास नाशिककरांवर मुंबईप्रमाणेच पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता आहे. याच संदर्भात आता महापालिका प्रशासनाकडुन विचार सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील धरणांचा भाग म्हणुन असलेल्या पश्चिम पट्ट्यात इगतपुरी, नाशिक व दिंडोरी तालुक्यात यंदा जुन व जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. परिणामी याभागातील धरण साठ्यात गत वर्षाच्या तुलनेत साठा हा अल्प आहे.

तसेच नाशिक शहरातील गोदावरी नदीला जुलै महिन्यात साधारणत: दोन तीन पुर येत असतांना जुलै संपल्यानंतरही गोदावरीला पूर आलेला नाही. एकुणच पावसाचे दोन महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील साठा कमी आहे.

यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर समुह धरणात 30 जुलै 2019 रोजी 76.47 टक्के पाणीसाठा होता, आजमितीत या ठरणात केवळ 40.62 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तर मुकणे धरणात 30 जुलै 2019 रोजी 46.93 टक्के पाणी साठा होता, आजमितीस या धरणात केवळ 28 टक्के पाणीसाठा आहे. तर दारणा धरणात केवळ मागील वर्षी 30 जुलैला 87 टक्के इतका पाणीसाठा होता, आता 30 जुलै 2020 रोजी 68 टक्के इतका साठा आहे.

यातील गंगापूर धरणातून शहरातील सुमारे 80 ते 90 टक्के भागाला दररोज 12.41 द.ल.घ.फु. पाणी पुरवठा केला जातो.

आज धरणातील साठा लक्षात घेता पुढच्या 15 दिवसात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्यास नाशिककरांवर मुंबईप्रमाणेच पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com