निफाडवर शोककळा; महाजनपूरच्या जवानाचे राजस्थानमध्ये निधन

निफाडवर शोककळा; महाजनपूरच्या जवानाचे राजस्थानमध्ये निधन

निफाड | प्रतिनिधी Niphad

निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील जवान राजस्थानमधील बाडमेर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. रंगनाथ वामन पवार असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे अद्याप कारण समजू शकले नाही. देशाचे संरक्षण करत असलेल्या जवानाचे निधन झाल्याने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे...

महाजनपूर येथील रंगनाथ वामन पवार यांचे 12वी पर्यंत शिक्षण झाले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ते गुरे चारण्यासाठी जात असत. त्यातच 1998 मध्ये मित्रांनी त्यास मध्यप्रदेशातील भोपाळ येथे सैन्य दलात भरती होण्यासाठी नेले. तेथेच त्यांची निवड झाली. पुढे प्रशिक्षणासाठी त्यांना सहा महिन्यासाठी झारखंड मधील हजारीबाग येथे पाठविण्यात आले.

त्यानंतर बीएसएफ (सीमा सुरक्षा बल) मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते राजस्थान मधील बाडमेर येथे सेवेत होते. आज सकाळी तांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

रंगनाथ यांच्या पश्च्यात वडील, आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. बंधू विलास हा उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत आहे. जवान रंगनाथ यांची सेवा थोडेच दिवस शिल्लक असल्याने त्यांनी नाशिक येथे जागा घेऊन बंगल्याचे काम सुरू केले होते.

आता हे काम पूर्ण झाले आहे. थोड्याच दिवसात नाशिक येथे स्थायिक होऊन ते नाशकात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच नियतीने घाला घातल्याने दु:ख व्यक्त केले जात आहे.

मयत रंगनाथ याचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले असून ते घेण्यासाठी बंधू विलास सकाळीच मुंबईकडे रवाना झाला आहेत. दरम्यान सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी. वाय. काद्री यांनी महाजनपुर येथे भेट दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com