काहीही होऊ द्या! भुजबळ साहेबच नाशिकचे पालकमंत्री - जयंत पाटील

काहीही होऊ द्या! भुजबळ साहेबच नाशिकचे पालकमंत्री - जयंत पाटील

नाशिक | प्रतिनिधी Nashik

छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून त्यांना निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होत आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जातोय, हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज नाशिक जिल्हयात दाखल झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी आलेल्या अभिप्रायचे वाचनही जयंत पाटील यांनी केले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळ साहेबांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

भुजबळसाहेबांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे. आपले फक्त ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

भुजबळ साहेब अफाट काम करत आहेत. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. आपले संघटन मजबूत असेल तेव्हा हे शक्य होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळ साहेबांच्या पाठपुराव्याने... त्यामुळे भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.

मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून पाऊस जरा जास्तच पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहत आहे. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

दरम्यान, पालकमंत्री पदावरून भुजबळ यांना हटविण्याची मागणी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केल्याबाबत जयंत पाटील यांना माध्यमांनी विचारले असता, काहीही होऊद्या भुजबळ साहेबच नाशिकचे पालकमंत्री राहतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्रनाना पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जेष्ठ नेते अंबादास बनकर , अरूण थोरात , विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.