नाशिक | प्रतिनिधी

शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात ९४ वे साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलनाचा मान नाशिकला मिळाल्यानंतर लगेचच लोकहितवादी मंडळाकडून नियोजनासाठी कंबर कसण्यात आली.

यादरम्यान, साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण राज्यातील पाच प्रमुख शहरात केले जाईल असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, थेट प्रक्षेपणाचा मोठा खर्च असल्याने ते केले जाणार नसल्याची माहिती आयोजकांनी नुकतीच दिली आहे...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचविण्याचा लोकहितवादी मंडळाचा मानस असून मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये केले जाईल, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक तथा मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली होती.

लोकांनी दिलेला प्रत्येक रूपया आमच्यासाठी महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. तो सत्कारणी लावला जाईल, असेही जातेगावकर यांनी सांगितले होते.

दरम्यान, साहित्य संमेलन कार्यालयात 'देशदूत'च्या प्रतिनिधींनी भेट दिली. यावेळी चर्चेदरम्यान उपस्थित मंडळातील सदस्य शंकर बोराडे यांनी थेट प्रक्षेपण होणार नसल्याचे सांगितले.

ते म्हणाले, थेट प्रक्षेपणाचा जो मोठा खर्च आहे तो टाळून समाजमाध्यमांवरील अपडेट्सवर भर दिली जाणार आहे. सद्यपरिस्थिती बघता प्रत्यक्षात मात्र, साहित्य संमेलनाचे फेसबुक खाते, कार्यालयीन संपर्क क्रमांक, Whtsapp नंबर अद्याप जाहीर झालेले नाही.

संपर्काचे प्रभावी माध्यम असलेले ट्विटरवर खातेदेखील साहित्य मंडळाकडून तयार करण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे.

आपण जेव्हा जागतिक इव्हेंट याठिकाणी घेतो आहोत. तर त्यासाठी सध्याची कोविड परिस्थिती बघता अनेकांना ऑनलाईन अपडेट्स बघायला, वाचायला रस आहे. त्यामुळे सोशल मीडियात जास्तीत जास्त अपडेट्स साहित्य संमेलनाच्या पाठवल्या गेल्या पाहिजेत असे जाणकार सांगतात.