नाशिक | प्रतिनिधी

निसर्गाची खाण, पर्यटनाचा केंद्रबिंदू व निसर्गाची अद्भुत किमया असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यातील काही भागात सध्या चित्रपट आणि मालिका आणि गाण्यांचे चित्रीकरण सुरु आहे....

चित्रनगरीला अत्यंत पोषक व अनुकूल नैसर्गिक स्थिती असलेल्या या तालुक्याची अनेक कलावंत व दिग्दर्शकांना भुरळ पडत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी त्रंबक परिसर हा चित्रीकरणासाठी स्पेशल शूटिंग झोन व्हायला हवा यासाठी नाशिकची कलाकार मंडळ खऱ्या अर्थाने प्रयत्नशील होती. नाशिक लाईन प्रोड्यूसर आलेल्या मंडळीनी तर दिग्दर्शकांना नाशकात आणून थेट स्पॉट दाखविले.

यानंतर खऱ्या अर्थाने मराठी, हिंदी सिनेमा मालिका तथा वेब सिरीज यांचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण या परिसरात होऊ लागले.

याद्वारे नाशिकच्या निसर्गसौदर्याची नवी ओळख चित्रनगरीला झाली आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे स्थानिकांना रोजगार निर्मिती यातून मिळाली.

त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पंचक कावनई परिसरात नाशिकचे प्रख्यात अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी पुढाकार घेवून एक संगीत अल्बमचे चित्रीकरण सुरु केले आहे.

या अल्बम मध्ये चिन्मय उदगीरकर व महेक शेख हे मुख्य भूमिकेत असून अजित देवळे ह्यांचे दिग्दर्शन व नितीन शिरसाट यांनी निर्मिती केली आहे.

या परिसरातील अनेक ठिकाणे अशी आहेत जी काळाच्या ओघात स्मृतीआड झाली आहेत. कुठल्याही चित्रीकरणात आलेली नाहीत त्यापैकीच एक अशी बुद्धकालीन लेणी इगतपुरी परिसरात आढळली.

त्याचे देखील शूटिंग करण्यात येत आहे. स्वित्झर्लंड मॉरीशस व जगातील निसर्गरम्य सुंदर स्थळे आपण कायम बघतो परंतु त्यांच्या ही तोंडात मारेल अशी आपल्या नाशिक परिसरात अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत असे निर्मात्यांचेच म्हणणे आहे.

चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी लोकेशन घेतले. अनेक लोकेशन नजरेत भरले मात्र इगतपुरी तालुक्यातील लोकेशन पाहता येथील निसर्गातून एक वेगळा आनंद व अनुभव घेता आला.

इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण पाहिल्यानंतर महाबळेश्वर व पाचगनीचाही विसर पडावा असा येथील निसर्ग मनाला भावला अशाही प्रतिक्रिया सध्या निर्मात्यांकडून मिळू लागल्या आहेत.