अंलगुण बंधारा फुटला; अनेकांचे संसार भिजले, बत्ती गुल, अनेक घरांच्या भिंती कोसळल्या

दुर्गम आदिवासी भागाला तातडीच्या मदतीची गरज
अंलगुण बंधारा फुटला; अनेकांचे संसार भिजले, बत्ती गुल, अनेक घरांच्या भिंती कोसळल्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. येथील अलंगुण गावाशेजारील बंधारा (Alangun Village Canal) अचानक फुटल्यामुळे संपूर्ण पाणी गावात शिरले. यामुळे गावातील सर्वांचेच संसार वाहून गेले आहेत. शेतीपयोगी साहित्य वाहून गेले आहे तर काबाडकष्ट करून कमावलेले अन्नधान्यदेखील या पाण्यात भिजले आहे. येथील परिसराला मदतीची अपेक्षा आहे...

अधिक माहिती अशी की, गेल्या सहा दिवसांपासून अलंगुण (Alangun area) परीसरात अती मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अलंगुण, तोरणडोंगरी रस्त्यावर असलेल्या अलंगुण गावात असलेला गावबंधारा ओव्हर फ्लो झाला.

गेल्या उन्हाळ्यात या बंधाऱ्यातील गाळ काढून जास्तीत जास्त पाणी साठा करून गाव व परीसरातील शेती तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था होईल असे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, यंदा संततधार पावसामुळे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण झाली.

बंधाऱ्यात पाणी आल्यानंतर येथील ग्रामस्थ सांडवा मोकळा करण्याचे प्रयत्न करत होते. परंतु संततधार पावसाने पाण्याची पातळी वाढत गेली, दोन जेसीबी मशिनच्या मदतीने संततधार पावसात उभे राहून शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते.

जोरदार पावसामुळे बंधाऱ्यातील पाण्याच्या दाब वाढत गेल्याने मातीचा भराव वाहत गेला. अशातच बंधारा फुटला अन संपूर्ण पाणी गावात शिरले. नदी किनाऱ्यावरील दोन तीन घरात पाणी शिरले. तसेच लाईटचे खांब, झाडे, शेती, किरकोळ अवजारे याचे नुकसान झाले आहे.

पाण्याचा प्रवाह अचानक आल्याने अवघे गावच जलमय झाले होते.अनेक घरात पाणी शिरल्याने सर्वदूर आरडाओरड आणि एकच धावपळ सुरु झाली. घरात पाणी शिरल्याने भांडी कुंडी, कपडे लत्ते, घरगुती सामान, औजारे धान्य, भिजून खराब झाले.

लाकडी कौलारू कच्चा भिंतीची घरे पडली. तसेच ग्रामपंचायतीमध्ये पाणी घुसल्याने दप्तर भिजून खराब झाल्याचे बोलले जात आहे. अनेकांच्या घरात पाण्याच्या प्रवाहाने वाहून आणलेला गाळ साचल्याने काढता काढता नाकीनऊ आले.

ओढ्याच्या काठावरील घरात दहा ते बारा फुट पाणी छपरा पर्यंत आले होते.या प्रवाहामुळे भातशेती बरोबरच शेतातील बांध, भाताची आवण यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गावातील विजेचे खांब कोसळले आहेत. ओढ्याच्या काठावरील झाडे, झुडपे उन्मळून पडली आहेत. गावात वाहून आलेल्या गाळामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गाळ हटविण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने दिवसभर सुरु होते.

हिच दुर्घटना रात्रीच्या वेळी झाली असती तर अनेकांना जीव गमवावा लागला असता. बंधारा फुटल्याची माहिती मिळताच तहसिलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी दिपक पाटील, पोलीस निरीक्षक सचिन कोळी, नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातील अधिकारी यांनी अलंगुण येथे घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करीत ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

या घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ झाली. पाण्याचा साठा वाढल्याने आधीच घटनेची दवंडी गावात दिली होती. त्यामुळे नागरिक सतर्क झाल्याने जिवितहानी टळली आहे. गावातील जनजीवन थोड्याफार प्रमाणात विस्कळीत झाले असले तरी जनजीवन पूर्वपदावर आले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम विज वितरण मार्फत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

सचिन मुळीक- तहसिलदार सुरगाणा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com