नाशिक मनपा निवडणूक नव्या वर्षात?

ओबीसी आरक्षणासाठी सर्वच पक्ष आग्रही
नाशिक मनपा निवडणूक नव्या वर्षात?

नाशिक । फारुक पठाण Nashik

करोना ( Corona )संकट तसेच ओबीसी आरक्षणामुळे ( OBC Reservation )रखडलेल्या नाशिक मनपा निवडणुकीला ( NMC Election )आता नव्या वर्षातच मुहूर्त सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सत्तांतर होऊन भाजपच्या पाठबळावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूक नको, अशी भूमिका भाजपने विरोधी पक्षात असतांना घेतली होती. ती आजही कायम आहे. विरोधी पक्षांनीही हीच भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे नाशिक मनपासह राज्यातील सर्व मनपा निवडणुका नव्या वर्षातच होण्याची शक्यता आहे.

करोनाकाळात राज्यातील औरंगाबाद आणि नवी मुंबईसह इतर काही मनपांचा कार्यकाळ संपला होता. तेथे प्रशासक वाटप सुरू झाली होती. नाशिक मनपासह राज्यातील सर्व मनपा निवडणुका करोना संपल्यानंतर वेळेवर होतील, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र ओबीसी आरक्षण मुद्दा समोर आल्यानंतर हळूहळू सर्व निवडणुका पुढे जाण्यास सुरुवात झाली. या घडामोडीनंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.

मात्र न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करून तारखा घोषित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राज्यातील मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान मागील काही दिवसांत राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार अस्तित्वात आले. या सरकारनेदेखील ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. दुसरीकडे न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासकीय पातळीवर मनपा निवडणुकीची तयारी जोमाने सुरू झाली आहे.

आरक्षण सोडत पूर्ण

ओबीसी आरक्षणाशिवाय इतर आरक्षण तसेच महिला आरक्षणाची सोडतदेखील पूर्ण करण्यात आली आहे. नाशिक मनपात यंदा 11 नगरसेवकांची वाढ होणार आहे. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 पर्यंत पोहोचणार आहे. यासाठी त्रीसदस्य प्रभाग पद्धतीने नुसार 43 त्रिसदस्य व एक चार सदस्य प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्याच्यावर हरकती मागून तीदेखील अंतिम प्रभाव रचना तयार झाली आहे. 23 जूनला प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येऊन 3 जुलैपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या. 16 जुलैस अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र त्याला मुदतवाढ मिळाली असून 21 जुलैस अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जानेवारी-फेब्रुवारीत मतदान?

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणूक होणार नाही, असे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे 2023 मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारीत नाशिक मनपा निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान 13 सप्टेंबर 2022 ला मनपा प्रशासकांची सहा महिन्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे प्रशासकांनादेखील राज्य शासन मुदतवाढ देऊ शकते, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com