नाशिक बाजार समिती निवडणूक: पिंगळे विरुद्ध खासदार गोडसे-चुंभळे गटात लढत रंगणार

किती विद्यमान संचालकांना उमेदवारी देताना डावलणार ? लागले लक्ष
नाशिक बाजार समिती
नाशिक बाजार समिती

नाशिक | विजय गिते | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (Nashik Agricultural Produce Market Committee) निवडणुकीत (election) आता रंग भरू लागले आहे.

शुक्रवारी (दि.३१) उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेले शक्ती प्रदर्शन पाहता निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त होणार, असे चित्र आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात भाजप - शिंदे गटात सरळ लढत होणार, असे वातावरण आहे.

सत्ताधारी माजी खासदार देविदास पिंगळे (Former MP Devidas Pingle) यांच्या गटाकडून नवे- जुने अशी सांगड घालत काही विद्यमान संचालकांना पॅनलमधून बाहेरचा रस्ता दाखवत उमेदवारी कापण्याच्या हलचाली सुरू असल्याची चर्चा आहे. तर खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), माजी सभापती शिवाजी चुंभळे (Former Speaker Shivaji Chumbhale) यांच्याकडूनही नवीन चेह-यांना रिंगणात उतरविण्याची रणनीती सुरु आहे.

सोमवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम दिवस आहे. त्यामुळे या दिवशी कोण कोण अर्ज दाखल करते यातूनही पुढची रणनीती ठरणार आहे. नाशिक बाजार समिती निवडणुकीत (Nashik Agricultural Produce Market Committee) माजी खासदार पिंगळे यांच्याशी दोन हात करण्यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी शिंदे गट व भाजप प्रणीत पॅनल रिंगणात उतरविणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे पिंगळे विरोधात माजी सभापती चुंभळे, गोडसे असा सामना रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

पिंगळे यांनी कॉंग्रेस (congress), शिवसेना (shiv sena) (उध्दव ठाकरे गट) यांना बरोबर घेत विकास आघाडीच्या माध्यमातून पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. गत पाच वर्षात पिंगळे गटाकडून निवडून आलेले संचालक थेट चुंभळे गटाला जाऊन मिळाले अन पुन्हा चुंभळे यांना सोडून पिंगळे गटात संचालक सामील झाले. त्यामुळे विद्यमान संचालकांच्या पाच वर्षातील धरसोड वृत्तीच्या भूमिकेमुळे त्यांच्या विषयी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नाराजीचा सूर आहे.

यातही विशेष म्हणजे पिंगळे यांच्या मागे मागे सावलीसारखे 24 तास फिरणाऱ्या, सतत कामात हस्तक्षेप करणाऱ्या काही संचालकांवर गटांतर्गतच नाराजी असल्याचे बोलले जात आहे. प्रामुख्याने पदाधिकारी निवडीत लुडबुड करणाऱ्या या संचालकांबद्दल असलेला रोष अनेकांनी पिंगळे यांच्याकडे व्यक्त करून याचा फटका पॅनलला बसण्याची शक्यता व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे तक्रारी असलेल्या संचालकांच्या उमेदवाऱ्या कापण्याच्या तयारीत पिंगळे असल्याचे बोलले जात आहे.

ग्रामपंचायतवर वर्चस्व असणाऱ्याला प्राधान्य

पिंगळे यांच्या गटाला टक्कर देण्यासाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.यावेळी त्यांना सहकारात नव्याने पदार्पण केलेल्या खासदार गोडसे यांच्यासह भाजपचीही भक्कम साथ मिळणार आहे.त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी करून उमेदवारी निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.प्रामुख्याने ग्रामपंचायतवर वर्चस्व असलेल्यांना उमेदवारी अंतिम मानली जात आहे. तसेच पिंगळे गटातून काही चेहरे गळाला लावण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचं बोलले जात आहे.उमेदवार हा ' साम दाम दंड ' असा बलवान अन बलाढय आपल्याच पॅनलमध्ये कसा राहील,आणि तो ओढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहे .

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com