मालेगाव | प्रतिनिधी

सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांची चर्चा होत आहे. नात्यांची खरी पारख आणि प्रतिष्ठा पणाला लावणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीला संबोधले जाते. अनेक गावात संबंध ताणले जाणे, वाद होणे हे या निवडणुकीत बघायला मिळत असते.

गावातील वैरभाव विकोपाला जाऊ नये, शांतता अबाधित राहावी, ग्रामस्थांनी मिळून मिसळून एकत्र राहावे, गावातील वैरभाव टाळण्यासाठी मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील केंद्रीय राखीव दलात कार्यरत असलेल्या एका जवानाने पत्राद्वारे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे साकडे घातले आहेत.

अशोक विठ्ठल देसले असे या जवानाचे नाव आहे. झोडगे ग्रामपंचायत माळमाथा भागातील प्रमुख ग्रामपंचायत तालुक्याच्या राजकारणात अनन्यसाधारण असे महत्त्व असलेली राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत ग्रामपंचायत आहे.

ही ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी गावात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वैरभाव निर्माण होऊ नये तसेच गावात शांतता राहून ग्रामपंचायतीचा कारभार एकमताने झाल्यास गावाचा विकास होऊ शकतो.

यासाठी जवान देसले यांनी तहसीलदार तथा मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रजीत राजपूत यांना आज निवेदन देऊन झोडगे ग्रामपंचायतीची निवडणूक लिलाव पद्धत वगळून बिनविरोध निवडणूक झाल्यास गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख रुपये विकास निधी म्हणून देईल अशी घोषणा केली आहे. लष्करी जवान देसले यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.