Video : परिक्षेत्रात गुन्हेगार दत्तक योजना - डॉ. दिघावकर

माध्यमांशी वार्तालाप
Video : परिक्षेत्रात गुन्हेगार दत्तक योजना - डॉ. दिघावकर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक परिक्षेत्रात गुन्हेगारी रोखण्यासाठी एक पोलीस एक गुन्हेगार या पद्धतीने गुन्हेगार दत्तक योजना राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये तो पोलीस सातत्याने त्या गुन्हेगारावर लक्ष ठेवून त्याच्या कारवायांना अटकाव करेल, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली...

नाशिक परिक्षेत्राचे महानिरिक्षक म्हणून डॉ. दिघावकर यांनी पदभार स्विकारला आहे. बुधवारी (दि.9) कार्यालयातील सभागृहात त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत हेाते.

दिघावकर म्हणाले, परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाशी लढा देण्यासोबतच तेथील कायदा व सुव्यवस्थाही अबाधित राखत आहेत. कोरोनामुळेही बर्‍याच अंशी गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक होत असल्याने त्यांना न्याय देण्यासाठी भविष्यात जो शेतकरी फसवणूकीची तक्रार करेल त्याची तातडीने दखल घेतली जाईल. याआधीही परराज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधून शेतकर्‍यांचे पैसे मिळवून दिल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.

नाशिक परिक्षेत्राला गुजरात, मध्यप्रदेश राज्यांच्या सीमा लागून आहेत. या भागातून होणारी हत्यारे, मद्य तसेच इतर अवैध तस्करी रोखण्यासाठी दोन्ही अधिकार्‍यांच्या बोर्डर मिटिंग घेऊन सीमावर्ती भागात तपासणी नाके वाढवण्यात येतील. तसेच त्या भागातील अधिकार्‍यांशी समन्वय ठेवून गुन्हेगार अदान प्रदान योजना कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचे डॉ. दिघावकर यांनी सांगीतले.

नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माझे पोलीस दल सदैव प्रयत्नशील राहणार आहे. कोरोनाच्या संकटात देखील उत्सव, सण शांततेत पार पडले आहे.

नाशिक परिक्षेत्रातील जनता सुज्ञ व कायद्याचे पालन करणारी आहे. अनलॉक प्रक्रियेत औद्योगिक वसाहती, उद्योगधंदे सुरु करण्याबाबतही काळजीपुर्वक नियोजन केले जात आहे. परिक्षेत्रात नागरीकांवर अन्याय होणार नाही यासाठी अपाण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशा व्यापर्‍यांच्या मुसक्या आवळणार

नाशिक परिक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये द्राक्षे, कांदा, डाळींब, केळी याचे मोठे उत्पादन होते. चांगल्या भावासाठी शेतकरी परराज्यातील व्यापार्‍यांसोबत व्यवहार करतात. मात्र अनेक व्यापारी शेतकर्‍यांचा माल घेऊन जातात व त्यांना दिलेले धनादेश बँकेत वटत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रूपयांची फसवणुक होते. भविष्यात नाशिक परिक्षेत्रात बळीराजाची आर्थिक फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, फसवणूक करणार्‍यांनी आठ दिवसात पैसे दिले नाहीत तर अशा व्यापार्‍यांच्या मुस्क्या आवळण्याचे आदेश देणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

नागरीकांसाठी कायम उपलब्ध

मी जनतेचा सेवक असून पोलीस शिपायापासून तर सर्वसामान्य व्यक्तीकरिता माझ्या दालनाचे दरवाजे कार्यालयीन वेळेत कायम खुले राहणार आहेत. माझ्या कोणत्याही पुर्व परवानगीशिवाय कोणीही नागरीक अगर पोलीस कर्मचारी मला केव्हाही भेटू शकणार आहेत. तसेच स्थानिक पोलिसांकडून मदत न मिळाल्यास किंवा अडचणीच्या वेळी नागरिकांनी 9773149999 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन दिघावकर यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com