
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते गुरुवारी (दि. १२) आपला उमेदवारी अर्ज कॉंग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे....
राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने यापूर्वीच त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी पुरस्कृत केली होती. डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.
२००९ मध्ये तत्कालीन आमदार प्रतापदादा सानवणे धुळे लोकसभा मतदारसंघात विजयी झाले होते. त्यांच्या खासदारकीमुळे रिक्त झालेल्या जागेवर अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. तांबे यांनी निवडणूक लढविली होती.
त्यावेळी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. नितीन ठाकरे, भाजपचे उमेदवार डॉ. प्रसाद हिरे यांचा हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता. २०१० मधील निवडणुकीत डॉ. तांबे हे काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असता त्यांच्यासमोर भाजपकडून प्रा. सुहास फरांदे यांनी आव्हान निर्माण केले होते.
या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ३५ हजारांच्या विक्रमी मतांनी ते निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली. भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील तांबे यांनी पराभव केला होता. आता कॉंग्रेसने त्यांना सलग चौथ्यांदा उमदेवारी जाहीर केली आहे.