आयुष्मान कार्ड वाटपात नाशिक राज्यात प्रथम

आयुष्मान कार्ड वाटपात नाशिक राज्यात प्रथम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आयुष्मान भारत योजने ( Aayushyaman Bharat Yojana )अंतर्गत ग्रामीण व शहरवासियांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आयुष्मान गोल्डन कार्डवाटप करण्यात येत असून आयुष्मान कार्ड वाटपात नाशिक राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 34 टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले असून हे उद्दिष्ट 70 टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्‍या आयुष्मान भारत योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. पुढील महिन्याभरात जिल्हाभरात गोल्डन कार्ड वाटपासंदर्भात 70 टक्के उद्दिष्ट गाठण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.आतापर्यंत 34 टक़्के उद्दिष्ट पूर्ण झालेले असुन पुढील महिन्याभरात एकूण 70 टक़्के म्हणजेच 10 लाख 96 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत गोल्डन कार्ड वाटपासंदर्भात संपूर्ण राज्यात नाशिक प्रथम स्थानावर आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात 16 लाख 12 हजार गोल्डन कार्डचे वाटप करण्यात येणार असून आतापर्यंत 5 लाख 48 हजार गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले आहे. तर 24 हजार 776 कार्ड (मयत, स्थलांतर) यामुळे रद्द करण्यात आले आहेत. नाशिकनंतर उस्मानाबाद, जालना, ठाणे, जळगाव यांचा क्रमांक आहे.

ग्रामीण भागात 40 टक्के

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल अहिरे यांच्या नियंत्रणाखाली गोल्डन कार्ड मोहिमेची कार्यवाही सुरु आहे.एकुण गोल्डन कार्ड वाटपापैकी आतापर्यंत ग्रामीण भागात 40 टक्के तर शहरी भागात 22 टक़्के नागरिकांना कार्ड वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात कार्ड वाटपाचे 34 टक़्के काम पुर्ण झाले आहे. एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 1 लाख 24 हजार कार्डचे वाटप करण्यात आले तर मागील एकाच महिन्यात 57 हजार कार्ड वाटप करण्यात आले. कार्डवाटपामध्ये संपूर्ण राज्यात नाशिक प्रथम स्थानावर आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुर्ख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून कार्डवाटपाची मोहिम वेगाने राबविण्यात येत आहे.

मोहिमेची व्यापकता वाढविणार : डॉ. आहेर

मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी आज (दि.4) जिल्हा परिषदेत तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी बैठकीत मार्गदर्शन करणार आहे. याचबरोबर शहरी तसेच ग्रामीण भागातील खाजगी हॉस्पिटल्सची देखील बैठक घेण्यात येणार असुन लाभार्थ्यांवर उपचार करण्याचे निर्देश देण्यात येणार आहे. कार्डवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आशा अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील आपले सरकार केंद्रांद्वारे वाटप करण्याची योजना आरोग्य विभागातर्फे तयार करण्यात आली आहे. कार्डद्वारे 5 लाखाचा विमा देखील देण्यात आला आहे. याचबरोबर युटीआय तसेच एनजीओमार्फतही यापुढे कार्ड वाटप करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com