राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात नाशिक राज्यात प्रथम

सीईओ मित्तल यांचा गौरव
राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात नाशिक राज्यात प्रथम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्व उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट कामकाज केले आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला.

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदार्‍या तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी राज्य कृती आराखड्याअंतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी हा कार्यक्रम शासनाच्या वतीने राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हापातळीवर एकूण आठ प्रकारचे उपक्रम राबवले जातात.

यामध्ये जीपीडीपी व एसडीजी प्रशिक्षण, ट्रेनिंग मॅनेजमेंट सिस्टीमवरील नोंदी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे प्रशिक्षण, ग्रामसेवक प्रशिक्षण, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान निधी खर्च, ग्रामपंचायत कार्यालय निधी बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती, सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर उद्दिष्टपूर्ती अशा आठ उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आशिमा मित्तल यांचा गौरव केला, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com