
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
नाशिकच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे आढळलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) चौकशी सुरु आहे. मात्र, हे प्रकरण अधिक तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) सोपविण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.
राज्यातील शालेय शिक्षण विभागातील (School Education Department) वर्ग १ आणि वर्ग २ मधील ३२ अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार होत असल्याबद्दल आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी शिक्षण विभागात गैरप्रकार केलेल्या ४० पैकी ३३ प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्याचे सांगितले.
शिक्षण विभागातील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. गरज पडली तर ही प्रकरणे ईडीकडे पाठविली जातील. राज्यात दरवर्षी एक लाख कोटी रुपये आपण शिक्षणावर खर्च करतो. पण त्यातून जो सामाजिक परतावा मिळायला हवा तो मिळत नाही, अशी खंत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
शिक्षण क्षेत्रात बदलाची निश्चितपणे आवश्यकता आहे. त्यामुळे अनुदानित खासगी शाळांतील पदभरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करता येईल का याचा विचार केला जाईल. त्यामुळे या पदभरती मधील गैरप्रकाराला आळा बसू शकेल. खासगी कोचिंग क्लासेसमुळे शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात किमान अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती बाबत निर्देश देण्यात येतील.
तसेच विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्रक्रिया १०० टक्के पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या निश्चित किती हे समजू शकेल, असेही फडणवीस यांनी अन्य प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सातारा येथील पदभरती संदर्भात अनियमितता झाली असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राष्ट्रवादीच्या रोहित पवार, अशोक पवार, समाजवादी पक्षाच्या अबू आझमी, शिवसेनेच्या महेश शिंदे, भाजपच्या योगेश सागर, सीमा हिरे आदींनी यावेळी उपप्रश्न विचारले.