Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकदोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नाशिककरांना पाडवा पहाटच्या रूपाने 'दिवाळी गिफ्ट'

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नाशिककरांना पाडवा पहाटच्या रूपाने ‘दिवाळी गिफ्ट’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिककर शास्त्रीय संगीतप्रेमींच्या जिव्हाळ्याची वार्षिक मैफल…आतुरतेने वाट पाहायला लावणारी सुमंगल स्वरबरसात… दिवाळी पाडव्याची पहाट स्वरचैतन्याने बहरून टाकणारा स्वरमहोत्सव म्हणजे अर्थातच पिंपळपार येथील पाडवा पहाट! दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा नाशिककरांना ऐकण्यास मिळाली….

- Advertisement -

शुक्रवार, ५ नोव्हेंबर २०२१, शुद्ध प्रतिपदा तथा दीपावली पाडव्याला पहाटे ५.०० वाजता यंदाची स्वरमैफल देशविदेशात आपल्या अनोख्या गानशैलीमुळे सुपरिचित असलेले स्व. पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य दिल्ली येथील पंडित हरीश तिवारी यांच्या स्वराभिषेकाने रंगली. त्यांना संवादिनी- सुभाष दसककर, तबला- नितीन वारे, पखवाज- दिगंबर सोनावणे व तालवाद्य- अमित भालेराव, तानपुरा – विनोद कुलकर्णी ह्यांनी साथसंगत दिली. स्वरांचे हे अग्निहोत्र 21 वर्षे अखंड तेवत राहिले.

या कार्यक्रमावर नाशिकरांनी अतोनात प्रेम केले. या पथदर्शी स्वरमैफलीच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रभर गावागावात अशा शास्त्रीय सांगीतिक मैफली झडू लागल्या. संस्कृती नाशिक तर्फे आयोजित पाडवा पहाटेच्या या कार्यक्रमात खंड पडला तो कोरोनाच्या साथीमुळे! गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये पाडवा पहाट या कार्यक्रमाच्या २२ व्या मैफलीचे आयोजन त्यामुळेच रद्द करावे लागले. यंदा मात्र महामारीचे ते काळे ढग नाहीसे होऊन स्वराभिषेकासाठी आभाळ मोकळे होत आहे.

संस्कृती नाशिकच्या पाडवा पहाट मैफलीच्या आयोजनाचे हे २२ वे वर्ष! या आगळ्यावेगळ्या स्वर पर्वणीच्या यशस्वितेचे श्रेय संस्कृती नाशिकच्या संगीत रसिकांना व संस्कृती नाशिकच्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांना देणे क्रमप्राप्त ठरते. अत्यंत कल्पकतेने, अथक परिश्रमातून ऐतिहासिक पिंपळपारावरची ही मैफल रुचिसंपन्नतेची उंची वाढवताना दिसते.

या कार्यक्रमाशिवाय संस्कृती नाशिक या संस्थेने ग्रंथयात्रा, शौर्यशताब्दी सोहळा, विविध व्याख्यानमालांचे सातत्याने यशस्वी आयोजन करून नाशिककर रसिकांच्या काळजावर सुवर्णमोहोर उमटवली आहे. कोरोना साथ प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करून पिंपळपार, नेहरू चौक या पारंपरिक स्थळीच या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, नगरसेविका शोभा बच्छाव, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी,डॉ . नारायण विंचूरकर, शिवाजीराव गांगुर्डे, श्रीरंग सारडा, आशित कौशिक, डॉ. कैलास कमोद, डॉ. अतुल वडगावकर, गुरमित बग्गा यांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या