मालेगावमधील 'त्या' तलवारींचे धुळे कनेक्शन?

नाशिक पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरु;
मालेगावमधील 'त्या' तलवारींचे धुळे कनेक्शन?

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पाठोपाठ परिक्षेत्रातील धुळे पोलिसांनी 25 तलवारींचा साठा हस्तगत केला आहे या तलवारीच्या रचनेमध्ये साधर्म्य असल्याने मालेगाव तलवारींचे धुळे कनेक्शन समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे नाशिक पोलीसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे...

काही दिवसांपूर्वी मालेगाव पोलिसांनी तिघा संशयितांकडून 40 तलवारी जप्त केल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मात्र, आता धुळे जिल्ह्यातही पोलिसांनी नुकत्याच 25 तलवारी जप्त केल्यात. दोन्ही ठिकाणी जप्त केलेल्या तलवारी सारख्याच असल्याचे समोर येत असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रात तलवारी येण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

या तलवारी पुरवणार्‍या मुख्य सुत्रधाराचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. शहर पोलिस सध्या शस्त्र बाळगणार्‍या सराईतांना लक्ष करीत असून, दररोज किमान दोन सराईत गुन्हेगार शस्त्रानिशी पकडले जातात. सराईत गुन्हेगारांकडून धारदार शस्त्रांचा वापर केला जातो.

मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या तिघांपैकी एक सराईत गुन्हेगार असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा कशासाठी आणला गेला, याचा तपास पोलिस करीत आहेत. दोन्ही घटनांमध्ये तलवारी सारख्याच असल्याने पोलिस सावध झाले आहेत.

या तलवारींच्या तस्करीचे मूळ एकाच ठिकाणी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. ग्रामीण पोलिसांनी याकडे आपले लक्ष वेधले असून, या गुन्ह्याचा शेवटच्या धाग्यापर्यंत तपास करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com