नाशिक । प्रतिनिधी

अलिकडच्या काही दिवसात ब्रिटनमधुन देशात परतलेल्या प्रवाश्यांना शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. ब्रिटनमधुन परतलेल्या जिल्ह्यातील 121 जणांची यादी जिल्हा प्रशासनाला मिळाली असुन यात महापालिका क्षेत्रातील 90 जणांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील सुमारे 25 जणांचा शोध लागला असुन शासननिर्देशानुसार त्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहे...

ब्रिटनमध्ये नवीन करोना विषशणूने थैमान घातल्यानंतर शेजारील देश सतर्क झाले असुन भारतानेही या देशांशी संपर्क तोडला आहे. या नव्या रुपातील करोना विषाणूची संपर्कात आलेल्या व्यक्तींला दुसर्या दिवशीच लागण होत असल्याने त्या प्रादुर्भावाच्या वेगामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ब्रिटन मध्ये सापडलेल्या नवीन करोना विषाणुमुळे या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले असुन प्रवाशी नागरिक आपल्या देशात परतत आहे. देशात परतलेल्या अनेक प्रवाश्यांना करोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच लक्षणे नसले तरी या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासंदर्भातील नियम राज्य शासनाने जाहीर केले आहे.

तसेच अलिकडच्या काही दिवसात ब्रिटन मधुन परतलेल्या नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या व्यक्तींची दोन दिवसात एकुण 121 जणांची यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. या यादीत असलेल्या पत्ता काही प्रमाणात अपुर्ण असल्याने या नागरिकांचा शोध घेण्याचे काम महापालिका वैद्यकिय विभागाकडुन सुरु झाले आहे.

नाशिक शहरातील रहिवाशी असलेल्या 90 नागरिकांपैकी फक्त 25 नागरिकांची माहिती मिळाली आहे. शहरातील या सर्व जणांची आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.