
नाशिक । प्रतिनिधी Nashik
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेले इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिकल क्लस्टर उभारताना नाशिकचा प्राधान्याने विचार व्हावा अशी आग्रही मागणी निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. उद्योगमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या प्रश्नाचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.
यावेळी निमाच्या शिष्ट मंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री सामंत यांना सादर केले. यावेळी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे कि,केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिकल क्लस्टर मंजूर केले आहे. त्यापैकी एका क्लस्टरला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे निधी व जागेच्या रूपाने नुकतीच चालना देण्यात आली आहे. दुसर्या क्लस्टर करताना नाशिकचे नाव प्राधान्यने चर्चिला गेले असून त्याची चाचणीही याआधी झालेली आहे आता निमा पॉवर एक्झिबिशनच्या माध्यमातून या क्लस्टरना मूर्तस्वरूप प्राप्त व्हावे म्हणून निमा प्रयत्नशील आहे.
ते प्राप्त झाल्यास नाशकात मे महिन्यात आयोजित निमा पॉवर एक्झिबिशनला अधिक महत्व मिळेल.नाशकात या क्लस्टरसाठी प्लॅटफॉर्म म्हणून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रुमेंटेशन, ऑटोमेशन या क्षेत्रातील जवळपास 1200 हून अधिक उद्योग उपलब्ध आहे.पाचशे ते हजार एकर जागा त्यासाठी राखून ठेवावी आणि या क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा प्रयत्न करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.दरम्यान या संदर्भात विशेष बैठक लावून नाशिकला झुकते माप देण्यात येईल असे आश्वासनहीं ना.उदय सामंत यांनी यावेळी दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंग कुशवाह, सहआयुक्त डी.एस.कोर्बू,निमाचे सचिव राजेंद्र अहिरे,निमा पॉवरचे चेअरमन मिलिंद राजपूत,विजय जोशी,विराज गडकरी,राजेंद्र वडनेरे,सतीश कोठारी,आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी,जयंत बोरसे,सहयुक्त राजपूत,संदीप पाटील आदींसह प्रशासकीय अधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.