
नाशिक | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह तालुकानिहाय पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेत तब्बल ४० टक्के अधिकारी 'ढ' असल्याचे निदर्शनास आले. मित्तल यांनी जाहीर नाराजी व्यक्त करताच कारवाईच्या भितीने अधिकार्यांचे धाबे दणाणले आहे.
कळवण, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर यासह मालेगाव तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठका घेतल्या असता यात, पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचे कामकाज असमाधानकारक आढळून आले होते.
त्यावर, मित्तल यांनी गत आठवडयात मुख्यालयातील तसेच प्रत्येक पंचायत समितीमधील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची बैठक घेतली होती. बैठकीत अचानकपणे प्रशासकीय कामकाजाची अधिकारींना किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी मित्तल यांनी उपस्थितीत अधिका-यांची परीक्षा घेतली. यात १५ सहाय्यक प्रशासन अधिकारी तर, ३६ प्रशासन अधिकारी यांनी ६० मार्कची परीक्षा दिली. त्यात तब्बल ४० टक्के अधिकार्यांना कमी गुण म्हणजे अगदी १० ते १५ दरम्यान गुण प्राप्त झाल्याने ते नापास झाले. ३० कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकार्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहे. यात 15 दिवसांनी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे या अधिका-यांना परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे.