बिटको तोडफोड प्रकरण: कोण आहेत राजेंद्र ताजणे ? का केला असा प्रकार?

नाशिक

नाशिक महापालिकेच्या बिटको कोविड सेंटरमध्ये भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी शनिवारी चांगलाच राडा घातला आहे. राजेंद्र ताजणे यांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घालत कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारावरील काचाही फोडल्या. या प्रकाराचा भाजपासह सर्वच पक्षांनी निषेध करत ताजणे यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय व निषेधार्य आहे. भाजपाकडून या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. ते भाजपात असते तर त्यांच्यांवर बडतर्फेची कारवाई केली असती. पोलिसांनी तपास करुन या प्रकारात योग्य ती कारवाई करावी. बिटकोमधील HRCT मशीन बंद होते. रुग्णांना बाहेर जावे लागत होते. मागील महिन्यात मी पाहणी केल्यावर HRCT बंद असल्याचे समजले. त्यानंतर दोन दिवसांत ते सुरु करण्याचे आदेश दिले व ते सुरु झाले. रुग्णांचा सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सातत्याने सुरुच आहेत.

गिरीश महाजन, आमदार, नाशिक प्रभारी

बिटको रुग्णालयात सुमारे साडेसातशे ते आठशे कोविड रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. महापालिकेने दक्षतेचा भाग म्हणून या रुग्णालयात पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. या रुग्णालयातील कर्मचारी आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. शनिवारी झालेल्या प्रकारामुळे ते ही चांगलेच घाबरले आहेत. राजेंद्र ताजणे यांच्या वडीलांचे काही दिवसांपुर्वीच कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले नाही, असे सांगितले जात आहे. परंतु रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात तक्रारी असल्यास नगरसेविका पत्नीच्या माध्यमातून त्यांना प्रशासनाकडे मांडता आल्या असत्या. परंतु साडेसातशे ते आठशे कोविड रुग्णांवर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णायलात असा प्रकार करुन दहशत माजवणे निदंनीय आहे. मात्र नगरसेविकेच्या पतीने अशाप्रकारे गोंधळ घालणे तसेच दहशत माजवणे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकारात आता प्रशासनाने काठोर कारवाईचे आदेश दिले असले तरी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीने हा प्रकार केला आहे, हे अतिशय गंभीर आहे.

कोण आहेत राजेंद्र ताजणे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा संघटना स्थापन केली होती. त्या नावाच्या संघटनेचे राजेंद्र ताजणे अध्यक्ष आहेत. मागील निवडणुकीत ते शिवसेनेत होते. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सीमा ताजणे भाजपात दाखल झाल्या. त्यांनी प्रभाग क्रमांक २० मधून निवडणूक लढवत विजय मिळवला.

सत्ताधारी पक्षातील नगरसेविकेच्या पतीकडून झालेले हे कृत्य निदंनीय आहे. लोकप्रतिनिधीचे प्रशासनावर वचक राहिले नाही, त्यातून असे प्रकार घडत असतात. आज डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी तणावात काम करत आहेत. या प्रकारामुळे ते घाबरले आहेत. शहरातील ८० टक्के रेमडेसिविर बिटको तर २० टक्के झाकिर हुसैन रुग्णालयात दिले जाते. त्यानंतर रुग्णांना ते मिळत नसतील तर जाते कुठे? गेटवेल फार्मा या कंपनीकडून ६ हजार रेमडेसिविरचा करार झाला होता. ते मिळाले नाही. मग या कंपनीवर कारवाई का झाली नाही? जर सत्ताधाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर विरोधक व सामान्यांनी काय करावे.

सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगर प्रमुख, नाशिक

मनपाचे रुग्णालयच असुरक्षित

गेल्याच महिन्यात शहरातील मानवता रुग्णालयासह चार खासगी रुग्णालयात हल्ले झाले होते. त्यानंतर शनिवारी बिटको रुग्णालयाच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात पोलीस बंदोबस्त असतानाही अशाप्रकारचे हल्ले घडत असतील तर खासगी रुग्णालयाच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

वरिष्ठांना माहिती दिली- महापौर

नवीन बिटको रुग्णालयात झालेली तोडफोडीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोनासारख्या संकटात बिटको रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम करत आहेत. अशावेळी ही घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. हा हल्ला का केला, त्या मागचे कारण काय याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. घडलेल्या प्रकाराबाबत पक्षाच्या नेत्यांना माहिती देण्यात आली आहे, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *