नाशिकमध्ये ईडीची झाडाझडती, तीन ठिकाणी छापे

महत्वाची कागदपत्रे जप्त; आर्थिक संस्था रडारवर
नाशिकमध्ये ईडीची झाडाझडती, तीन ठिकाणी छापे
USER

नाशिक | प्रतिनिधी

नाशकात दाखल झालेल्या ईडी (अंमलबजावणी संचलनालय) च्या पथकांनी राज्यभर गाजलेल्या केबीसी गुंतवणुक घोटाळा तसेच सिन्नर येथील कोट्यवधी रूपयांचा घोटाळा असलेल्या सिन्नर नागरी पतसंस्था व एका व्यावसायीकाचीही चौकशी केल्याची माहिती सुत्रांनी दिली..

यासह भारतीय खाद्य निगम (फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया) च्या नाशिक येथील कार्यालयाकडूनही काही माहिती मागवल्याचे समजते.

भल्या भल्यांना धडकी भरवणार्‍या ईडीची पथके दोन दिवसांपासून नाशिक मुक्कामी आहेत. जिल्हा परिषद कार्यालयासमोर असलेल्या सिन्नर नागरी पतसंस्थेत सकाळी काही अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यानंतर महत्वाची कागदपत्रे चौकशीसाठी त्यांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

दरम्यान, इडीकडून कोणाची चौकशी सुरु आहे? याबाबत सोशल मीडियात तर्क वितर्क लढवले जात होते.

गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून देशभरातील आठ हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूकीचा केबीसी घोटाळा उघडकीस आला होता.

या कंपनीचा संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण या दाम्पत्याने जून २०१४ मध्ये भारतातून पलायन केले होते. गुन्हेगार हस्तांतर करार नसलेल्या सिंगापूर देशात त्यांनी आश्रय घेतला.

परंतु सीआयडीकडून तपास पोलिसांकडे येताच मे २०१६ मध्ये त्यांना नाशिक पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली. तेव्हापासून चव्हाण दाम्पत्य कारागृहात आहे.

सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१४ ते २०१६ लेखापरीक्षण अहवालात संस्थेचे चेअरमन, संचालक, सरव्यवस्थापक व कार्यकारिणीने संगनमत करून संस्थेतील विनातारण कर्ज प्रकरणे, कर्ज बोजा नोंद न केलेल्या मिळकती, कर्ज असताना देण्यात आलेले नील दाखले, संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर केलेले कर्जवाटप तसेच खोटे दस्तऐवज तयार करून संस्थेची व ठेवीदारांची ४३ कोटी ४८ लाख ४१ हजार ८२२ रुपयांची फसवणूक केली़.

याप्रकरणी सनदी लेखापाल अजय राठी यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट २०१७ रोजी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़.

संचालक मंडळातील १३ जणांना ग्रामिण पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून पतसंस्थेचा अध्यक्ष सुरज प्रकाश शहरा व व्यवस्थापक ए.टी. जंजिरे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होते. काही दिवसांपुर्वीच त्यांची जामीनावर मुक्तता झाली आहे.

परंतु काही काळातच या घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने सुरज शहाच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

केबीसी ३०० कोटींचा घोटाळा

केबीसी कंपनी परकीय चलनात गुंतवणूक करते. त्यातून होणार्‍या व्यवहारातून छोटयामोठया चढ-उतारात नफा कमावला जातो. तसेच मालमत्ता खरेदीतून फायदा कमवाला जातो. त्यामुळे अडीच ते तीन वर्षांत कंपनी गुंतवणुकीवर दुप्पट ते तिप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवले गेले.

यामुळे मजुर, शेतकरी, नोकरदार यांनी कर्ज काढून या कंपनीत गुंतवणुक केली. काहींनी शेती विकली तर अनेक सेवानिवृत्तांनी आपली जीवनातील सर्व पुंजी या कंपनी गुंतवली होती. परंतु परतावा मिळत नसल्याने जुलै २०१४ मध्ये पहिली तक्रार शहर पोलीसांत दाखल झाली होती. यानंतर आठ हजार तक्रारदार पुढे आले. तर एकुण घोटाळा ३०० कोटींवर गेल्या आहे. यातील अनेक गुंतवणुकदारांनी आत्महत्याही केल्या आहेत.

सिन्नर पतसंस्था ४४ कोटींचा घोटाळा

सिन्नर येथील मोठे प्रस्थ असलेले प्रकाश शहा यांच्या मुलाने ही पतसंस्था सुरू केली होती. प्रकाश शहा यांचे प्रस्थ व विश्‍वास यामुळे या पतसंस्थेत मोलमजुरी करणारा मजुर ते मोठे व्यावसायिक यांनी हजार ते कोट्यवधी रूपयांची गुंतवणुक केली होती. या संस्थेच्या सिन्नरसह नाशिक शहरातील जिल्हा परिषदेसमोर व सिडको अशा दोन शाखा स्थापन झाल्या होत्या. अल्पावधीतच संस्थेतील ठेवी १०० कोटीच्या पुढे गेल्या होत्या. परंतु संचालक मंडळाने या पैशांचा गैरवापर सुरू केला. या पतसंस्थेत अनेक गोरगरीबांचे पैसे अडकले आहेत.हा घोटाळा ४४ कोटींपर्यंत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com