Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासत्ताबदलाचा फायदा नाशिकला

सत्ताबदलाचा फायदा नाशिकला

नाशिक । फारूक पठाण Nashik

मागील दोन आठवड्यांमध्ये राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या. यानंतर राज्यात नवीन सरकार आले तर शिवसेनेचे ( Shivsena) बंडखोर गटाचे नेते तथा माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( Chief Minister Eknath Shinde ) झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तसेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले. यानंतर नाशिक ( Nashik )शहरावर त्याचा चांगला परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

कारण गत पाच वर्षे नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. याकाळात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, राज्य सरकाराने तसेच प्रशासक राजवटीत भाजप काळातील अनेक कामांवर फुली मारण्याचे धोरण सुरू झाले होते. सत्तांतर झाल्यानंतर ही रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट तयार करून भाजपसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. या सत्ताबदलाचा परिणाम राज्याच्या राजकारणात जसा होईल, तसाच नाशिक महापालिकेत होणार आहे.

नाशिकमधील बहुप्रतीक्षित व महत्त्वाकांक्षी असलेले ज्यासाठी केंद्र सरकार सुमारे दोन हजार कोटी रुपये देणार आहे अशा नमामि गोदा प्रकल्प, आयटी हब, लॉजिस्टिक पार्क तसेच महापालिकेतील नोकरभरती प्रक्रिया तसेच शहरातील महापालिकेच्या भूखंडांचा बीओटी तत्त्वावर होणारा विकास आदी रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत.

2017 पासून महापालिकेत भाजपची सत्ता होती. महापौर असताना सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी आयटी हब, लॉजिस्टिक पार्क, नमामि गोदा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन केले. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने या प्रकल्पांना गती मिळत नव्हती तर यातील बर्‍याच कामांवर फुली मारण्याचे धोरणदेखील स्वीकारण्यात आले होते.

मात्र आता राज्यातील सत्ताकेंद्र बदलल्याने भाजपच्या बहुप्रतीक्षित प्रकल्पांना एकप्रकारे गतीच मिळ्णार आहे. आडगांव परिसरात आयटी हब व्हावे याकरता माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आयटी हबचा शुभारंभदेखील झाला.

राणे यांनी लवकर प्रस्ताव पाठवा, तत्काळ तुम्हाला आयटी हब मंजूर करून देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, या आयटी हबसाठी तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या होत्या. त्यावेळी राणे यांनी राज्य शासनाला घाबरूनच आयुक्त कार्यक्रमाला आले नसल्याचे म्हटले होते. आयटी हबनंतर लगेच आडगाव परिसरातच लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्याच दिवशी बहुप्रतीक्षित असलेला नमामि गोदे प्रकल्पाचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला.

या प्रकल्पांचे भूमिपूजन झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट सुरू झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. यामुळे महापालिकेतील भाजप सत्ताकाळात विकासकामांचे भूमिपूजन झाले ते पुढे कसे जाणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यातील काही कामांवर तर प्रशासकांनी थेट फुली मारली होती.

13 मार्च 2022 रोजी महापालिकेची मुदत संपल्याने पालिकेत प्रशासक राज सुरू झाले. त्यामुळे जोवर प्रशासक यावर लक्ष देणार नाही तोवर प्रकल्पांना गती मिळ्णार नसल्याची भावना भाजपेयींची होती. रमेश पवार यांनी आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर तिन्ही प्रकल्प तत्काळ मार्गी लावण्याची मागणी माजी महापौर कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेत केली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने या प्रकल्पांना जाणूनबूजून डावलत असल्याचा आरोप केला जात होता. नमामि गोदा प्रकल्पासाठी सल्लागार पदाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तीदेखील कासवगतीनेे. तर आयटी हब आणि ट्रक टर्मिनल या प्रकल्पांसाठीची कार्यवाही होताना दिसत नाहीये. राज्यातील सत्ताकेंद्र दुभंगत नव्याने शिंदे गटाच्या मदतीने राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्याने नाशिक महापालिकेत भाजपने ज्या मोठ्या प्रकल्पासाठी प्रयत्न केले होते त्यांना आता पुन्हा गती मिळ्णार आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

2017 ते 2022 या पाच वर्षांच्या काळात नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. याकाळात कधी नव्हे अशी विकासकामे करण्यात आली. नावीन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या तसेच बहुतेक कामांचे भूमिपूजनदेखील झाले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या राज्य शासनाने तसेच महापालिकेत प्रशासक राजवट आल्यानंतर भाजपने सुरू केलेल्या अनेक कामांची गती मंदावली होती. तर काही कामे थेट बाजूला ठेवण्यात आली होती. गत पंचवीस वर्षे नाशिक महापालिकेत भरती झालेली नाही, यासाठी मी सतत पाठपुरावा केला.यासाठी विशेष महासभादेखील घेतली. शासनाकडे तसा प्रस्तावदेखील पाठवण्यात आला. मात्र प्रशासनासह शासनानेदेखील त्याची दखल घेतली नाही. आता भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यामुळे आम्ही लवकरच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आदींना भेटून नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये जी कामे सुरू झाली होती ती पूर्ण करण्याची मागणी करणार आहोत. आम्हाला खात्री आहे की, शहरातील हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी लॉजिस्टिक पार्क असो की आयटी हब, नमामि गोदा प्रकल्प असो की बीओटी तत्त्वावर शॉपिंग सेंटर उभारण्याचे काम आदी कामांना शासनाकडून गती मिळणार.

सतीश कुलकर्णी, माजी महापौर

सर्व प्रकल्प मार्गी लागणार आम्ही सत्तेत असताना शहराच्या विकासाच्या दृष्टीने भरपूर कामे केली. केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी यासाठी आणला. यामध्ये लॉजिस्टिक पार्क असो की आयटी हब तसेच नमामि गोदा प्रकल्प यासाठी केंद्राने मंजुरी देऊन भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात भूमिपूजनदेखील झाले. विकासकामांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आता पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यामुळे नाशिकच्या विकासासाठी आम्ही जे काही केलेले आहे ते सर्व प्रकल्प मार्गी लागतील. गणेश गीते, माजी सभापती, स्थायी समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या