Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामुले म्हणतात ‘कर के सिखो’

मुले म्हणतात ‘कर के सिखो’

नाशिक । Nashik प्रतिनिधी

लॉकडाउनच्या काळात मुलं शाळेत येऊ शकणार नाहीत, आणि शिक्षण तर चालू राहायला हवे. ते तसे सुरु ठेवण्यासाठी एक मध्यम मार्ग काढण्याचे आम्ही ठरवले. काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जाऊ लागला होता पण ऑनलाईन शिक्षणात (Online Education) जाणवणार्‍या फायद्यापेक्षा तोटे अधिक आहेत असे आमचे ठाम मत असल्याने या पर्यायाला काट मारली.

- Advertisement -

लहानग्या मुलांना (चौथीपर्यंत) ऑनलाईन अभ्यासाची अजिबात गरज नाही ही भूमिका शाळेने घेतली व ती कसोशीने पाळत आहोत असे आनंद निकेतन शाळेच्या (Anand Niketan School Nashik) नीलिमा कुलकर्णी (Nilima Kulkarni) यांनी सांगितले.

शाळा बंद असल्यातरी मुलांना ‘शिकते’ ठेवणे महत्त्वाचे!

ऑफलाईन शिक्षण कसे सुरु आहे?

पहिली ते सहावीसाठी पाठ्यक्रमाच्या मागे न लागता क्षमता विकास करणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कृतिपत्रिकांचा संच पालकांकडे दिला आहे. रोज 3 विषयांचे व्हिडीओ, ऑडिओ किंवा सविस्तर सूचना ग्रुपवर टाकत आहोत, त्याप्रमाणे पालक मुलांकडून करून घेत आहेत. अर्थात गृहपाठ देखील केवळ वाचन लेखन असा नसून त्यात प्रत्यक्ष कृती, निरीक्षणे, पालकांची मदत घेऊन करण्याच्या गोष्टी आहेत. मुलांना मजा येईल अशा कृतींचा जाणीवपूर्वक समावेश केला आहे. सातवी ते नववीसाठी ‘कर के सिखो’ हा थोडा वेगळा प्रयोग आम्ही राबविला. जूनमध्येच अत्यंत काटेकोर नियोजन करून आम्ही 100 विषय (अभ्यासाव्यतिरिक्त) प्रकल्पासाठी काढले, ते मुलापर्यंत व्हास्टसअप मार्फत पोहोचवले. त्यातील 1 ते 3 विषय मुलांनी स्वत:च्या आवडीप्रमाणे निवडले. साधारण 4/5 मुलांमागे एक असे सांगाती (तज्ज्ञ व्यक्ती) नेमून दिले. 20 ते 25 दिवस मुलांनी केवळ प्रकल्पाचे काम केले, या प्रक्रियेत मुले खूप रमली होती त्यांनी स्वत: आवडीचा विषय निवडला होता, त्याचे नियोजन केले. प्रकल्पाच्या गरजेनुसार स्वत: माहिती मिळवली. त्यावर प्रक्रिया करून तिची योग्य मांडणी केली, फोनवरच मुलाखती घेतल्या, वेगवेगळ्या प्रतिकृती तयार केल्या. मुले नवीन भाषा/अ‍ॅप शिकले. चित्रे काढली, कुणी परसबागेत, गच्चीवर बाग तयार केली, निरीक्षणे केली ती नोंदवली, कुणी स्वत: ब्लॉग लिहिले. कोणी स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरु केले. मुलांनी निवडलेल्या विषयाचा सखोल अभ्यास केला. अडचणींवर मार्ग काढले. याचा उपयोग त्यांना आता पुढील अभ्यासासाठी देखील होईलच.

मोठया वर्गातील विद्यार्थ्याचा अभ्यास कसा सुरु आहे?

6 जुलैपासून मुलांना पुन्हा पाठ्यक्रमाकडे वळवले आहे. दहावीला हीच पद्धत मे पासूनच राबवत आहोत. पण दहावीसाठी मात्र आता दिवसातून दोन ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत, ज्या मुलांकडे त्यासाठी योग्य फोन नव्हते त्यांना वापरात नसलेले पण चांगले फोन काही काळापुरते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मार्गांमुळे थोडेसे ऑनलाईन व बरेचसे ऑफलाईन असे शाळेचे स्वरूप ठेवले आहे, प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचा आम्ही शोधलेला हा मार्ग आहे.

पालकांना कसे सहभागी करून घेतले?

पालकसभा घेतल्या. त्यांना शाळेची भूमिका ठामपणे सांगितली, पालक आम्हाला संपूर्ण सहकार्य करत आहेत. मुलांच्या कारक हालचाली, भाषा, मोजणी यादृष्टीने ठरलेले उपक्रम योग्य सूचनांसह पालकांकडे पाठवले जातात, लेखनपूर्व तयारीसाठी दिल्या जाणार्‍या कृतिपत्रिका पालकसभेतच पालकांकडे दिल्या आहेत. याशिवाय गाणी, गोष्टी, खेळ यांचे व्हिडीओ पाठवतात व मुलांचेही मागवतात. मुले घरात अनेक जीवनकौशल्ये शिकत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या