
नाशिक | Nashik
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Power Struggle) या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, हा निकाल येण्याआधीच विधानसभेचे उपसभापती आणि राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी १६ आमदारांच्या (MLA) प्रकरणासह मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे...
झिरवाळ यांना 'तुमच्याकडे १६ आमदारांचे प्रकरण आल्यावर काय करणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, "येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन", असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पुढे ते म्हणाले की, "विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असं होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे", असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हा निकाल आता कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे.
तसेच झिरवाळ यांना पुढे तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? असा प्रश्न देखील पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी मिश्किल शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "केलं तर मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो. पण त्यासाठी संख्याबळ हवे आहे ना. माझे कधीच होर्डिंग्ज लागणार नाहीत. लागले तर तुमचे आशीर्वाद पक्के असे समजायचे. स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही. पंरतु, हा जर तरचा प्रश्न असून त्याला काहीही अर्थ नाही", असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. त्यातील न्यायमूर्ती एम. आर. शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. तर १३ मे रोजी शनिवार आणि १४ मे रोजी रविवार आहे. त्यामुळे ८ ते १२ मे दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.