नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

धरण परिसरात एक हजार पक्ष्यांचा अधिवास
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

निफाड । प्रतिनिधी

करोना संसर्गाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने शासनाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यासह राज्यभरातील आणखी चार अभयारण्य पर्यटकांसाठी खुले केले आहे. त्यामुळे एरव्ही बंद असलेले हे अभयारण्य आता पर्यटकांनी गजबजणार आहे. साहजिकच नोव्हेंबर ते मार्च महिन्यात येथे पुन्हा पक्षीप्रेमी पर्यटकांना पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता येणार आहे.

महाराष्ट्रचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे आगमन होते. वनविभागाने येथे पर्यटकांसाठी नानाविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे स्थानिक पक्ष्यांंचा किलबिलाट ऐकू येत आहे. करोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता, महाराष्ट्र शासनाने दि.14.4.2021 रोजी हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद केले होते.

मात्र, आता करोना संसर्ग कमी झाल्याने महसूल, वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन व महाराष्ट्र राज्य शासन निर्णय क्रं. ऊचण/2020/उठ92/ऊखडच-1 दि.4.6.2021 नुसार शासनाच्या सूचनांचे पालन करून हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले केले आहे.

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम अभयारण्य तर जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्य देखील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात 1 हजार पक्ष्यांचा अधिवास दिसून येत असून यात दलदल ससाणा, कमळपक्षी, नदीसूरय, हळदी-कुंकू, वारकरी, जांभळी पानकोंबडी, पानकावळा, बगळा, खंड्या, राघू आदी पक्ष्यांचा समावेश आहे.

सध्या पावसाळ्यामुळे धरण परिसरात मुबलक पाणी असून दलदल व पाणथळ प्रदेश कमी झाल्याने पक्ष्यांना भक्ष्य शोधणे अवघड झाले. साहजिकच या काळात पक्ष्यांची संख्या कमी होते. मात्र नोव्हेंबर पासून थंडीची चाहूल लागताच पक्षी पुन्हा नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याकडे परतू लागतात. हे पक्षी साधारण मार्चपर्यंत मोठ्या संख्येने धरण परिसरात दिसून येतात. शासनाने अभयारण्य खुले केल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

देश-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट

येथील अभयारण्यात गुजरातमधून फ्लेमिंगो, युरोपमधील मछली घार, हिमालयातून ब्राम्हणी बदक, सैबेरियातून कॉमन क्रेन याबरोबरच देशभरातील स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने येतात. साधारणपणे पक्ष्यांचा हवाई मार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो. म्हणजे मुंबई, ठाणे पासून ते जायकवाडी धरणापर्यंत पक्षी विहार करतात. जून, जुलै हा महिना नदीसूरय व कमळ पक्ष्यांंचा विनिचा हंगाम असतो. साहजिकच हे पक्षी अभयारण्य परिसरात घरटी बनवितांना दिसत आहे. सध्याही धरण परिसरात देश-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे.

प्रथमेश हाडपे, वनपरिक्षेत्र अधिकारी (नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com