Monday, April 29, 2024
Homeनंदुरबारकौतुकास्पद : एप्रिल महिन्यात हजार रुग्ण, आता एका अंकात रुग्णसंख्या

कौतुकास्पद : एप्रिल महिन्यात हजार रुग्ण, आता एका अंकात रुग्णसंख्या

नंदुरबार |

नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्यात रोजची रुग्णसंख्या८०० ते हजारापर्यंत गेली होती. मात्र नागरिक व प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे आता ही संख्या रोजी ४ ते ८ अशा एकेरी आकड्यांवर आली आहे.

- Advertisement -

जिल्हयातील अक्कलकुवा व धडगाव हे दोन्ही तालुके कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. अक्कलकुवा तालुक्यात ४ तर धडगाव तालुक्यात केवळ २ कोरोना रुग्ण आहेत. याशिवाय तळोदा तालुक्यात १३, शहादा तालुक्यात २४, नवापूर तालुक्यात २८ तर नंदुरबार तालुक्यात ६६ अशा एकुण १३७ रुग्णांवर सध्या कोविड कक्षात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जिल्हयातील खाजगी व शासकीय कोविड सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या १ हजार ३१८ पैकी १ हजार २४६ बेड रिकामे आहेत. त्यामुळे अक्कलकुवा, धडगाव तालुक्यासोबतच संपुर्ण जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. परंतू असे असले तरी तिसर्‍या लाटेचा धोका ओळखून नागरिकांनी अधिक सतर्क राहून स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे.

आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

नंदुरबार जिल्हयात मार्च व एप्रिल या दोन महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. दररोज आठशे ते हजार कोरोना रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णसंख्या ही या दोन्ही महिन्यात दहा हजारांवर पोहचली होती.

त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी बेडही उपलब्ध होत नव्हते. अनेक जणांवर वेळेवर उपचार न झाल्याने त्यांना जीव गमवावा लागला. परंतू जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना, लॉकडाऊन यामुळे रुग्णसंख्या मे महिन्यापासून कमी होवू लागली.

सद्यस्थितीत नंदुरबार जिल्हयात केवळ १३७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील ६६, शहादा तालुक्यातील २४, तळोदा तालुक्यातील १३, नवापूर तालुक्यातील २८, अक्कलकुवा तालुक्यातील ४ तर धडगाव तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. सध्याची आकडेवारी पाहता येत्या दोन चार दिवसात अक्कलकुवा व धडगाव हे दोन्ही तालुके कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

अक्कलकुवा तालुक्यात आतापर्यंत ९ हजार ६९० संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यातील १ हजार १९८ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले. त्यापैकी १ हजार १६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुुरु आहेत.

धडगाव तालुक्यात आतापर्यंत ८ हजार ५६७ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यातील ८६२ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले. त्यापैकी ८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुुरु आहेत.

नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत ८० हजार ७७२ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यातील १५ हजार ९८६ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले. त्यापैकी १५ हजार ५३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नंदुरबार तालुक्यात ३८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६६ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुुरु आहेत.

शहादा तालुक्यात आतापर्यंत ५५ हजार ५०५ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यातील ११ हजार ६६४ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले. त्यापैकी ११ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहादा तालुक्यात २३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २४ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुुरु आहेत.

तळोदा तालुक्यात आतापर्यंत २३ हजार ६४१ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यातील ३ हजार ७६६ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले. त्यापैकी ३ हजार ६५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तळोदा तालुक्यात ९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुुरु आहेत.

नवापूर तालुक्यात आतापर्यंत २३ हजार ६७८ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यातील ४ हजार १२९ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यापैकी ३ हजार ९२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवापूर तालुक्यात १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २८ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुुरु आहेत.

येत्या दोन चार दिवसात जिल्हयातील अक्कलकुवा व धडगाव हे दोन्ही तालुके कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. शिवाय इतर चार तालुक्यांमध्येही रुग्णांची संख्या अत्यल्प असल्यामुळे संपुर्ण जिल्हा लवकरच कोरोनामुक्त मुक्त होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी राज्यात पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. या पाचही स्तरांमध्ये राज्यातील विविध जिल्हयांचा समावेश करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हयाचा दुसर्‍या स्तरात समावेश होता. परंतू जिल्हयातील रुग्णसंख्या कमी झाल्याने दुसर्‍यास्तरात असलेला नंदुरबार जिल्हा पहिल्या स्तरात आला असून जिल्हयातील सर्व व्यवहार, व्यवसाय सुरळीत झाले आहेत.

मात्र, रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही तिसर्‍या लाटेचा धोका पाहता नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. जिल्हयातील सर्व व्यवहार सुरु झाले आहेत. त्यामुळे नागरिक अगदी बिनधास्तपणे बाजारपेठेत फिरतांना दिसत आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी आहे, याचा अर्थ असा नाही की कोरोना संपला आहे.

गेल्यावर्षीदेखील अशाचप्रकारे रुग्णसंख्या कमी झाली होती. परंतू मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. ही परिस्थिती पुन्हा येवू नये असे नागरिकांना वाटत असेल तर त्यांनी कोविड नियमांचे पालन करण्यासोबतच स्वयंशिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तिसरी लाट आल्यास तिला सामोरे जाण्यासाठी प्रशासनासह नागरिकांसाठी अत्यंत धोकेदायक ठरणार आहे.

जिल्हयात १२४६ बेड खाली

नंदुरबार जिल्हयात १२ शासकीय व २१ खाजगी कोविड सेंटर आहेत. शासकीय कोविड सेंटरमध्ये ६३० बेड असून त्यापैकी ५९० बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. ४० बेड रुग्णांनी भरलेले आहेत. खाजगी कोविड सेंटरमध्ये एकुण ६८८ बेड आहेत, त्यापैकी ६५६ बेड उपलब्ध असून ३२ बेड रुग्णांनी भरलेले आहेत. खाजगी व सरकारी कोविड सेंअर मिळून १ हजार ३१८ बेड आहेत. त्यापैकी केवळ ७२ बेड रुग्णांनी भरलेले असून तब्बल १ हजार २४६ बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. मार्च व एप्रिल महिन्यात रुग्णांना एकेक बेड मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. रुग्णालयांबाहेर बेड उपलब्ध नाहीत, असा फलक लावावा लागला होता. परंतू आता या परिस्थितीवर मात झाली असून हजारो बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, पुन्हा कोरोनाचा उद्रेक होवू नये यासाठी आता नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे.

जिल्हयाचा रिकव्हरी रेट ९७.२९ टक्के

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत २ लाख ७ हजार २५९ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ६७ हजार ४५२ रुग्णांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. ३७ हजार ६०५ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. ३६ हजार ५३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ९३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३७ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत. त्यामुळे जिल्हयाचा पॉझिटीव्हीटी रेट हा १८.१४ टक्के असून मृत्यू दर २.३२ टक्के आहे. तर रिकव्हरी रेट९७.२६ टक्के आहे.

सर्वाधिक रुग्ण नंदुरबार तालुक्यात

नंदुरबार जिल्हयातील एकुण रुग्णसंख्यांची आकडेवारी पाहता नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून सर्वात कमी रुग्ण धडगाव तालुक्यात आढळून आले आहेत. नंदुरबार तालुक्यात४२.५ टक्के, शहादा तालुक्यात ३१ टक्के, तळोदा तालुक्यात १० टक्के, नवापूर तालुक्यात ११ टक्के, अक्कलकुवा तालुक्यात ३.२ टक्के तर धडगाव तालुक्यात २.३ रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या