कॉंग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार? नाना पटोले, म्हणाले...


कॉंग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार? नाना पटोले, म्हणाले...

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Elections) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. कॉंग्रेसकडून (Congress) नाशिक पदवीधरसाठी डॉ. सुधीर तांबेंना (Dr.Sudhir Tambe) चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. पंरतु,अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ. तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेऊन पुत्र सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात सध्या नाराजीचा सूर असल्याचे समोर आले आहे.

त्यातच सत्यजित तांबेंनी (Satyajit Tambe) आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे विधान केल्याने आणखी गोंधळ वाढला आहे. आता या राजकीय गदारोळात काँग्रेसची भूमिका नेमकी काय? काँग्रेस तांबे पिता-पुत्रावर कारवाई करणार की सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार? असा प्रश्न उपस्थित होत असतांनाच त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, उमेदवार बदलाबाबत आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नसून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारात (Candidate) अचानक बदल का करण्यात आला, याची आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज का भरला नाही, याची माहिती घेतली जात आहे. सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी काय करावे, हे त्यांनीच ठरवावे. तसेच उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेतांना विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे नेमका हा निर्णय का घ्यावा लागला, त्याची कारणे काय, याबद्दल चर्चा करून या सगळ्या प्रकरणाची पक्षीय पातळीवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर या मुद्द्यांवर अधिक प्रतिक्रिया देऊ असे पटोलेंनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com