थकित कर्ज सभासदांच्या सातबार्‍यावर विकास सोसायटीचे नाव

थकित कर्ज सभासदांच्या सातबार्‍यावर विकास सोसायटीचे नाव

नाशिक । विजय गिते Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ( NDCC Bank )वर्षानुवर्षे थकबाकीदार शेतकर्‍यांच्या जमिनीवर आता संबंधित विविध कार्यकारी सोसायटीचे नाव सातबारावर (नोंद) लागले आहे. सुमारे पाच ते सहा कोटी रुपये या शेतकर्‍यांकडून वसूल होणे बाकी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुमारे 75 शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर सोसायटीचेे नाव लागले आहे.

जिल्हा बँकेचे 30 जून 2022 अखेर जिल्ह्यातील 62,815 थकबाकीदार सभासदांकडे 1135 कोटी इतकी थकबाकी होती. संबंधित थकबाकीदार सभासदांपैकी 23,784 थकबाकीदार सभासदांचे 101 चे वसुली दाखले दप्तरी प्राप्त असून त्यापैकी 30 नोव्हेंबर 2022 अखेर 6575 सभासदांकडून पूर्ण वसुली झालेली आहे. त्यापोटी 8325 लाख इतका वसूल बँकेस जमा झालेला आहे.

उर्वरित 22, 422 व नवीन प्राप्त दाखले 2092 असे एकूण 24,514 दाखल्यांपैकी 10,537 दाखल्यांवर कलम 107 अन्वये जंगम जप्तीची कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यापैकी लिलाव प्रक्रियेसाठी 1420 प्रकरणे मूल्यांकनाकरता दाखल केले असता 774 मूल्यांकन दाखले प्राप्त झाले असून 672 थकबाकीदार सभासदांकडे जंगम स्थावरची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. या लिलावापोटी संबंधित थकबाकीदाराकडून 2 कोटी 80 लाख रुपये वसूल करण्यातआले आहेत.

मूल्यांंकनप्राप्त थकित कर्जदार सभासदांची तीनवेळा लिलावाची प्रक्रिया राबवूनही मालमत्ता खरेदीस खरेदीदार न आल्याने एकूण 445 प्रकरणे कलम 100/85 च्या कारवाईसाठी तयार असून त्यापैकी संबंधित विभागीय कार्यालयाने व विशेष वसुली अधिकारी यांनी एकूण 408 प्रकरणे तालुका रजिस्टारकडे कलम 100/85 अन्वये संबंधित थकबाकीदार थकित कर्जदार सभासदांच्या सातबारा उतार्‍यावर बँकेचे तसेच संस्थेचे नाव मालक म्हणून नोंद होण्याकरता आदेशासाठी रजिस्टारकडे दाखल करण्यात आले आहेत.

जमीन झाली सोसायटीच्या नावावर

आतापर्यंत जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या सुमारे 75 थकबाकीदार सभासदांकडून पाच ते सहा कोटींची वसुली असल्याने थकबाकीदार शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर त्या-त्या विकास सोसायटीचे नाव लागले आहे. या निर्णयामुळे जमिनीचा मालक आता वि. का. सोसायटी झाली असली तरी संबंधित थकबाकीदार सभासदांना ही जमीन कसता येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com