मविप्र निवडणूक : 21 जागांसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात

सरचिटणीस पदासाठी पवार-ठाकरे; अध्यक्षपदासाठी आ. कोकाटे-डॉ. ढिकले यांच्यात सामना
मविप्र निवडणूक : 21 जागांसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे ( MVP Election ) चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले असून सत्ताधारी प्रगती व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत पाहायला मिळणार आहे.या निवडणुकीतून 213 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 21 जागांसाठी आता 59 उमेदवार रिंगणात आहेत.

सरचिटणीस पदासाठी सत्ताधारी पॅनलकडून विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार तर विरोधी पॅनलकडून अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्यात पारंपरिक लढत होणार आहे. तर अध्यक्षपदासाठी चिटणीस डॉ. सुनील ढिकले व आमदार माणिकराव कोकाटे यांच्यातीळ सरळ लढत रंगतदार होऊन लक्षवेधी ठरणार आहे.

विशेष म्हणजे प्रगती पॅनलकडून विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्या जागेवर डॉ. सुनील ढिकले यांना बढती देत उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान पदाधिकारी दत्तात्रय पाटील यांचाही पत्ता कट झाला आहे. परिवर्तन पॅनलकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

प्रगती व परिवर्तन पॅनल या दोन्हीही पॅनलने कार्यकारिणीतील पदांसाठी उमेदवारी देताना सर्वाधिक सभासद मतदार संख्या असलेल्या निफाड तालुक्याला झुकते माप दिले आहे. याबरोबरच प्रादेशिक समतोलही राखण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनलकडून झाल्याचे दिसते.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी पॅनल नेतृत्वाकडे एकच गर्दी केली होती. त्यामुळे नेतृत्वाचाही चांगलाच कस लागला. काहींना उमेदवारी नाकारल्यामुळे निर्माण होणारी नाराजी टाळण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी पॅनलकडून नाराजांना आपल्या बाजूला खेचण्याची संधी मिळू नये यासाठी दोन्ही पॅनलने दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम उमेदवारांची घोषणा करणे प्रामुख्याने टाळले. तोपर्यंत इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांचीही उत्सुकता ताणली गेली.

माघारीकरता अखेरचा अर्धाच तास शिल्लक राहिला असताना प्रगती पॅनलकडून अंतिम उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर परिवर्तन पॅनलकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आली. परिणामी दोन्ही पॅनलकडून दोन्हीही थडीवर हात ठेवून असलेल्या इच्छुकांची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे उमेदवारी मिळू न शकलेल्या सभासदांची माघारीसाठी एकच धावपळ उडाली. यातही काही इच्छुकांनी उमेदवारी मागे घेण्यास आढेवेढे घेतल्याने अशा उमेदवारांची पॅनलप्रमुखांना मनधरणी करावी लागल्याचे चित्र होते. दरम्यान, इच्छुकांनी या निवडणुकीत अखेर माघार घेतल्यामुळे आता प्रगती व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना तालुका सदस्यपदाच्या उमेदवारीवरच समाधान मानावे लागले.

आहेर यांच्यासाठी आ. डॉ. राहुल आहेर यांनी केलेली शिष्टाई फळाला आली नाही

आ. अ‍ॅड.राहुल ढिकले उमेदवारी जाहीर होईपर्यंत तळ ठोकून

दिंडोरीचे विद्यमान सदस्य दत्तात्रय पाटील यांच्यासाठी ज्येष्ठ संचालक श्रीराम शेटे व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील यांनी केलेली मोर्चेबांधणी निष्फळ ठरली

श्रीराम शेटे यांच्या नाराज गटाने मविप्र संस्थेच्या मुख्यालयासमोर केली घोषणाबाजी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मविप्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांची उमेदवारी रद्द तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचाही पत्ता कट

रवींद्र पगार यांच्यासाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घातले साकडे; परंतु अखेरच्या क्षणी पगार यांची उमेदवारी रद्द, तालुका संचालकपदही त्यांना राखता आले नाही.

2017 च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचा अर्ज बाद ठरवणारे सुरेश डोखळे यांना परिवर्तन पॅनलने नाकारली उमेदवारी

सुरेश डोखळे यांना प्रवीण जाधव ठरले सरस

चांदवड तालुक्यात विद्यमान संचालक उत्तमबाबा भालेराव डॉ.आत्माराम कुंभार्डे यांना ठरले सरस

तालुक्यातील सदस्यांचा कल उत्तमबाबा यांच्या बाजूने गेल्याने झाला निर्णय

परिवर्तन पॅनलमध्येही माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व डॉ.सयाजी गायकवाड यांच्यात चुरस असताना डॉ. गायकवाड यांना निष्ठेचे मिळाले फळ

नांदगाव तालुक्यात प्रगतीकडे सर्वाधिक चुरस रंगलेली असताना चेतन पाटील यांनी तेज कवडे व विठ्ठल आहेर यांना पिछाडीवर टाकत उमेदवारी पटकावली

निवडणुकीत सर्वाधिक मतदार असलेल्या निफाड तालुक्यातून ‘प्रगती’ व ‘परिवर्तन’ पॅनलकडून प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात

महिला उमेदवारांमध्ये प्रत्येकी एक निफाडचा तर दुसरा उमेदवार सटाणा तालुक्यातील असल्यामुळे तुल्यबळ लढत रंगणार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com