अजितदादा-फडणवीस यांची संगीतखुर्ची

उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदाची अदलाबदल
अजितदादा-फडणवीस यांची संगीतखुर्ची

नाशिक । विशेष प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र विधानसभेत (Maharashtra Legislative Assembly) अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संगीत खुर्चीचा खेळ रंगल्याचे चित्र ताज्या सत्ताबदलानंतर पाहावयास मिळत आहे.

काल-परवापर्यंत पवार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची (Leader of the Opposition) भूमिका निभावत होते. आता याउलट चित्र मराठी जनतेला पाहावयास मिळत आहे.

फडणवीस आता शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत तर विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अजित पवार यांची आजच एकमताने निवड झाली. पवार आणि फडणवीस यांच्यातील पदबदल पाहिल्यावर दोघे जण संगीत खुर्ची खेळत असल्याचा आभास महाराष्ट्राला (maharashtra) आणि त्यांच्या समर्थकांना झाल्याशिवाय राहिला नसेल.

अजित पवार (Ajit Pawar) आतापर्यंत 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress) सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण मुख्यमंत्रीपद काँग्रेसला (congress) मिळाले. अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अजितदादांचे अभिनंदन करताना फडणवीस यांनी पवार यांची तोंड भरून स्तुती केली.

त्यांच्यातील पदांच्या आदलाबदलीच्या खेळावरही फडणवीस यांनी भाष्य केले. आधी मी विरोधी पक्षनेता होतो. अजितदादा उपमुख्यमंत्री होते. आता मी उपमुख्यमंत्री झालो. त्यांची जागा आता मी घेतली आहे आणि माझी जागा त्यांनी घेतली आहे. दोघेही 72 तासांच्या सरकारचे सहकारी आहोत, असेही फडणवीस म्हणाले. राजकारणात अजितदादांच्या प्रेमाची दादागिरी चालते, असे फडणवीस म्हणाले. त्याआधी विश्वास ठरावानंतर अभिनंदनपर भाषणात अजित पवार यांनी फडणवीसांची फिरकी घेतली. 2019 पासून आतापर्यंत फडणवीस यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि आता उपमुख्यमंत्री अशी तिन्ही पदे भूषवल्याचे पवारांनी नजरेस आणून देताच फडणवीसांनाही हसू आवरले नाही.

106 आमदारांचे संख्याबळ असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होत नाही, पण 39 आमदारांच्या गटाचा नेता मुख्यमंत्री होतो. त्यात काहीतरी काळंबेरं आहे, अशी शंका सरकारने विश्वास ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर भाषणात अजित पवार यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदेंसह बंडखोर गटातील आमदारांना सुनावण्याची संधीही पवार यांनी साधली.

पवार यांनी अभिनंदन भाषणावर भाष्य करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आगामी काळातील सरकार आणि विरोधी पक्षांतील संघर्षांची सूचक शब्दांत जाणीवही करून दिली. सत्तांतरनाट्य घडल्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील पदांची अदलाबदल झाली. यानिमित्ताने दोघांनाही 2019 सालातील पहाटेचा शपथविधी राहून-राहून आठवला असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com