वृद्धाची हत्या; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

वृद्धाची हत्या; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

नांदूर शिंगोटे | प्रतिनिधी Nandurshingote

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात चास खिंडीत शुक्रवारी (दि.23) सकाळी 10 वाजेच्या सुमारास 65 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. भाऊसाहेब रामनाथ आहेर (65), रा. लोणी खुर्द, ता. राहाता, जि. अहमदनगर असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चास खिंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मंदिरापासून 100 फुट अंतरावर, वनविभागाच्या जागेत निर्जन स्थळी हा मृतदेह पडलेला होता. गायी चारणार्‍या गुराख्याने हा प्रकार गावातील नागरिकांना सांगितल्यानंतर नांदूरशिंगोटे दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर यांना नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके यांनी दिलेल्या माहितीनंतर वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर, सोनवणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

यावेळी मृतदेहाच्या खिशात 7/12 उतारा तसेच  मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली आणि दहा फुट अंतरावर रक्ताने माखलेला दगड आढळून आला. 7/12 उतार्‍यावर भाऊसाहेब रामनाथ आहेर यांच्या नावाची नोंद होती. मृतदेहाजवळ पडलेल्या दोन फोेन पैकी एका फोनवरुन नातलगांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेत मृतदेहाची ओळख पटविली.

मयत भाऊसाहेब आहेर यांचा भाऊ  कैलास रामनाथ आहेर वय 50, धंदा- शेती रा. लोणी खु, नळेगांव रोड, शिंदे वस्ती ता. राहता जि. अहमदनगर यांनी वावी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार  भाउसाहेब रामनाथ आहेर हे त्यांची पत्नी मथुराबाई, मुलगा एकनाथ यांच्यासह   त्यांच्या शेतामध्ये वस्ती करून राहतात. मुलगा एकनाथ दारू पिण्याची सवय असल्यानेे त्याची दारू सोडण्यासाठी त्यावर उपचार करण्यासाठी भाउ भाउसाहेब हे नेहमी कुठल्यातरी बाबीकडे जात येत होते.

गुरुवारी (दि.22) सायकाळी 4 वाजेच्या सुमारास भाउसाहेब आहेर हे घरातून कोणास काहीएक न सांगता निघुन गेले होते. शुक्रवारी (दि.23) सकाळी 11.30 वा. सुमारास  लोणी खुर्द  गांवातील शरद बाबासाहेब आहेर यांनी कैलास फोन करून सांगिताने की, नांदुर शिंगोटे गावाजवळ एका इसमाचे खिशात तुमचे नावांचा 7/12 उतारा मिळाला आहे तसेच त्याचा फोटो माझे मोबाईलवर आलेला आहे. मी तुम्हाला पाठवितो असे म्हणून त्याने माझे मोबाईलवर मयताचा फोटो पाठविला तो मी बघीतला सदरचा फोटोमधील इसम भाउसाहेब रामनाथ आहेर यांचा असल्याचे  ओळखले त्यानंतर कैलास आहेर, विलास आहेर, शरद बाबासाहेब आहेर, गोतम दिलीप आहेर असे गाडी करून नांदूरशिंगोटे  शिवारात चास खिड़ी जवळ पोहचले व त्यांनी मृताची ओळख पटवली.  याबाबत वावी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,  पोलिस उपअधिक्षक सोमनाथ तांबे यांनीही घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाकामी सूचना केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com