मनपा निवडणूक पुढील महिन्यात?

मनपा निवडणूक पुढील महिन्यात?

नाशिक । फारूक पठाण Nashik

नाशिक महापालिका निवडणूक ( NMC Election )पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेचे 122 वरून 133 नगरसेवक होणार आहे. याबाबतची प्रशासकीय तसेच निवडणूक आयोगाच्या ( Election Commission ) पातळीवर तयारी पूर्ण झाली आहे.

फक्त जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांंकडून मतदान यादी जोडून आरक्षण सोडत जाहीर करायची आहे, तसेच महिला आरक्षण टाकायचा आहे. यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओबीसी आरक्षणावरून ( OBC Reservation )सुरू झालेल्या न्यायालयीन लढाई व त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाकडून आलेल्या आदेशानुसार नाशिक महापालिकेसह राज्यातील इतर सर्व महापालिका पुढे जाण्याची शक्यता असली तरी निवडणुका जास्त पुढे जाणार नाही तर पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने विशेष विधेयक देखील पारित केले असून राज्यपालांनी त्याच्यावर स्वाक्षरी केल्याने तो राजपत्र नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून करण्यात आलेली प्रभागरचना देखील रद्द होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक मधील त्रिसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे पंधरा लाख लोकसंख्येच्या नुसार प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे, त्यात बदल करण्याची शक्यता कमी असल्याचे म्हणणे आहे. याबाबत अद्याप निवडणूक आयोगाने काहीही आदेश काढलेले नाही. यामुळे कधीही आदेश निघणार अशी चर्चा आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नाशिक महापालिका प्रशासनाने शहरात 3 सदस्य प्रभाग रचना तयार करून त्याबाबतचा अहवाल शासन तसेच निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे. प्रारुप प्रभाग रचना वर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती घेण्याची मुदत देण्यात आली होती, या काळात एकूण 211 विविध प्रकारच्या हरकती या संपूर्ण प्रभाग रचनेवर आल्या होत्या.

23 फेब्रुवारी रोजी सिडकोचे सहसंचालक अश्विन मुदगल यांनी त्याच्यावर सुनावणी घेतली तर सहा मार्चला अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे गेलेला. मात्र यानंतर आरक्षणाची प्रक्रिया होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे राज्य शासनाने याबाबत विधेयक आणून निवडणूका लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका प्रशासनाला पुढील काही आदेश आले नाही तर राजपत्र आल्यानंतर शासनाकडून देखील काही स्पष्ट सूचना आलेले नाही.

सोशल मीडियावर( Social Media ) चर्चांना उधाण

नाशिक महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असली तरी सोशल मीडियावर थेट निवडणूक कार्यक्रम घोषित होत आहे. आज देखील या बाबत अनेक पोस्ट फिरत होत्या. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. राज्य निवडणूक आयोग तसेच राज्य शासनाने अद्याप निवडणुकीबाबत कोणतेही पत्र काढलेले नाही, तरी सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.