Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा निवडणूक : इच्छुकांची मोर्चेबांधणी, आरक्षणापर्यंत मौन

मनपा निवडणूक : इच्छुकांची मोर्चेबांधणी, आरक्षणापर्यंत मौन

नाशिक । फारूख पठाण Nashik

नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले ( NMC Elections ) असून प्रभाग रचना जाहीर होऊन त्याच्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या, त्याच्या अहवाल देखील राज्य निवडणूक आयोगाकडे ( State Election Commission ) रवाना झाला आहे.

- Advertisement -

मात्र अद्याप आरक्षणाची सोडत निघालेली नाही. शहरात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी झाली आहे. मात्र अनेक दिग्गज नेत्यांनी अद्याप आरक्षण जाहीर न झाल्यामुळे चुप्पी साधली आहे. 2017 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी 122 जागांसाठी सुमारे आठशे उमेदवार रिंगणात होते तर यंदा अकरा जागांची वाढ झाल्याने 133 जागांवर किती उमेदवार राहणार, याकडे देखील लक्ष लागले आहे.

यंदाची निवडणूक तीन सदस्यी प्रभागा पध्दतीने होणार आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनाचे ( Ward Structure ) काम पूर्ण करण्यात आले आहे. दुसरीकडे सर्व राजकीय पक्षांसह अनेक अपक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असली तरी जोपर्यर्ंत अंतीम रचन अर्थात वॉर्ड सीमा किटींगसमोर येत नाही व प्रभाग आरक्षणाची सोडत निघत नाही तोपर्यंत आपण कोणत्या प्रभागात व कोणत्या पक्षाच्या वतीने लढणार याबाबत चुप्पी साधली आहे. नाशिक महापालिका निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

भारतीय जनता पक्षाला ( BJP ) 2017 साली पहिल्यांदाच बहुमत मिळाल्याने सलग 5 वर्षे त्यांचाच महापौर होता. यामुळे पुढील काळातही आपलीच सत्ता कायम राखण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यात येत आहे. तसेच पाहिले गेले तर भाजपचे पाहणे जड मानले जात आहे. कारण मोठ्या प्रभागांचा फायदा भाजपा होतो, असा आजवरचा अनुभव आहे. तर दुसरीकडे शहरातील चार पैकी मध्य नाशिक, पश्चिम नाशिक व पूर्व नाशिक या तीन विधानसभा मतदार संघात भाजप आमदार आहे.

तर सध्या पक्षाचे 66 नगरसेवक मैदानात आहे. दुसरीकडे केंद्रात सत्ता असून नाशिक जिल्ह्यात केंद्रीय राज्य मंत्री देखील आहे. या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी एक दिलाने काम झाल्यास तरच पुन्हा सत्ता हातात येणार, ही जाणीव पक्षाच्या वरिष्ठांना चांगली माहिती असल्यानेच आतापासूनच लहान-मोठ्या बैठक सुरू झाल्या आहेत. तर वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे दौरे देखील वाढले आहे. भारतीय जनता पक्षातील मोठे नेते शिवसेनेच्या गळाला लागतील यामुळे पक्ष पातळीवर पुन्हा माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हाती नाशिकची कमान देण्यात आली आहे, तर त्यांना सहाय्यक म्हणून आमदार जयकुमार रावल यांनादेखील ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय जनता पक्ष कोणत्या पद्धतीने आपली रणनीती ठरवते याकडे देखील लक्ष लागले आहे.

शिवसेनेची ( Shivsena ) जोरदार मोर्चे बांधणी सुरूच आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांनी नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचा होणार, अशी घोषणा करुन दिली आहे. यामुळे सैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यात सत्ता व आपला मुख्यमंत्री यामुळे बळ मिळत आहे. त्याच प्रमाणे शहराची धुरा अभ्यासू व कडवट शिवसैनिक नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना दिल्यानंतर शहरात अनेक भागात शाखा सुरू होऊन संघटन मजबूत होतांना दिसत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे दिग्गज नेते माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, ज्येष्ठ नेते सुनील बागुल आदींनी देखील आपली शक्ती पणाला लावल्याचे दिसत आहे. मध्यंतरी भाजप नगरसेवक प्रथमेश गिते तसेच अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश करून एक प्रकारे भाजपला दे धक्का देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने ( NCP ) देखील तयारीत कसूर सोडलेली नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा जोश पहायला मिळत आहे. व सध्या असलेल्या जागांमध्ये शंभर टक्के वाढ होणार, असा दावा करण्यात येत आहे. पक्षाचे संघटन देखील मागील काही काळात मजबूत झाल्याचे दिसत आहे.

नाशिक हा कधीकाळी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही. शहराध्यक्ष वेळ देत नसल्याची तक्रार आहे. तर मुस्लीम बहुल जुने नाशिक भागात मुस्लीम चेहरा नसल्याने देखील फटका बसण्याची शक्यता आहे. संघटन देखील काही भागात कमकुवत असल्याचे दिसते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना( MNS ) यंदा जोमात कामाला लागली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे ठाकरे यांचे सतत दौरे होत आहे. आगामी निवडणूक युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे तरुण वर्गात विशेष आनंद व्यक्त होत आहे. 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या सत्ता काळात शहराचा झालेला विकास, भ्रष्टाचाराचा एकही आरोप न होता कोट्यवधींची झालेली कामे, आदी लोकांपर्यंत नेण्याची तयारी मनसेनेची असून कामदेखील सुरू झाले आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टी, आरपीआय, एमआयएम, बसपासह इतर काही पक्षांनी देखील मनपा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर अपक्षांची संख्यादेखील मोठी आहे.

यंदा किती उमेदवार?

इच्छुकांची संख्या सतत वाढत आहे. निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपर्यंत किती इच्छुक तयार होतात याकडे लक्ष लागले आहे. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक शहरातील एकूण 122 जागांसाठी सुमारे आठशे उमेदवार रिंगणात होते तर यंदा अकरा जागांची वाढ होऊन 122 वरून 133 नगरसेवक निवडून जाणार असल्यामुळे इच्छुकांच्या संख्येत मागच्या वेळी पेक्षा यंदा वाढ होणार हे नक्की.

- Advertisment -

ताज्या बातम्या