उत्पन्नवाढीसाठी महापालिकेचे प्रयत्न

महापालिकेला भासू लागली आर्थिक चणचण
उत्पन्नवाढीसाठी महापालिकेचे प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी

मागील सुमारे पंधरा महिन्यांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक वेळा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोतही आटला. महापालिकेला आता आर्थिक चणचण भासू लागल्याने महापालिका विविध मार्गाने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून काही कामे ठेकेदार पद्धतीने करून घेण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तर पुढच्या महिन्यापासून घरपट्टी वसुलीसाठी जप्ती मोहीमदेखील हाती घेण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

करोनाचा फटका सर्वांनाच बसला आहे. यामध्ये महापालिकादेखील सुटली नाही. यामुळे आता उत्पन्न वाढीकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक शहरात सुमारे साडेनऊ हजार फेरीवाल्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून 100 टक्के वसुली होणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नाही. 2019 मध्ये बाजार फी वसुलीतून महापालिकेला 87 लाख 42 हजार तर 2020 मध्ये 61 लाख 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

फक्त अधिकृत फेरिवाल्यांचाच विचार केल्यास व एका फेरिवाल्यांकडून वीस रुपये याप्रमाणे फी गृहीत धरली तर एका दिवसात 1 लाख 90 हजार रुपये महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे. तर महिन्याला 57 लाख व वार्षिक पावणेसात कोटी रुपये मिळू शकतात. प्रत्यक्षात मात्र पाहिजे त्याप्रमाणे वसुली होत नसल्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट झाली आहे.

100 टक्के वसुली होण्यासाठी प्रशासनासमोर खासगीकरणाचा देखील एक प्रस्ताव आहे. त्याच्यावर देखील विचार सुरू आहे. खासगी ठेकेदारामार्फत बाजार फी वसूल करण्याबाबत अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. यामुळे 100 टक्के वसुली झाल्यास महापालिकेच्या तिजोरीत चांगला पैसा येऊ शकतो. त्याचबरोबर पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठीही मनपाची जुलैपासून जप्ती मोहीम सुरू होणार आहे.

दीड वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. तर दुसरीकडे विकास कामांसाठी महापालिकेला निधीची आवश्यकता आहे. यामुळे घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या बड्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करावी, अशा सूचना मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी आढावा बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने लागू केलेली सवलत योजना देखील फारशी यशस्वी ठरली नाही. करदात्यांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिकेने घरपट्टीत पाच टक्के सूट दिली होती. तरी एप्रिल व मे 2021 या दोन महिन्याच्या काळात घरपट्टी वसुलीचा आकडा दहा टक्क्यांचा पल्ला ओलांडू शकलेला नाही. चालू आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट्य 190 कोटी असताना गेल्या दोन महिन्यात अवघ्या 18.38 कोटी रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com