आयटी हबसाठी मनपा आयुक्तांचा पुढाकार

आयटी हबसाठी मनपा आयुक्तांचा पुढाकार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मनपाच्या ( NMC ) वतीने आडगांव शिवारात आयटीहब ( IT Hub in Adgaon ) साकारण्यासाठी तत्कालीन भाजप सत्ताकाळात महापौर सतीश कुलकर्णी यांनी विशेष पुढाकार घेतला होता. महासभेत ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे तसा देखील पाठविण्यात आले होते. तर महापालिकेत प्रशासक राजवट सुरू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन देखील करण्यात आले होते.

मात्र प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने हा विषय बाजूला केला होता. आता पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यामुळे नाशिकच्या आयटी पार्कच्या कामाला गती मिळत असून महापालिका आयुक्तांनी देखील याबाबत कंपन्यांसह काही शेतकर्‍यांची चर्चा केली आहे. लवकरच याबाबत प्रस्ताव तयार करून केंद्राकडे रवाना होणार असल्याचे समजते.

केंद्रातील मोदी सरकारने आयटी हबसाठी एसपीव्ही अर्थात स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. नाशिक शहरामध्ये होणार्‍या आयटी पार्कसाठी कुलकर्णी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तर सुमारे 1300 आयटी क्षेत्राशी संबंधित मुलांची वॉकेथॉन घेण्यात आली होती. त्या वॉकेथॉन मधील सहभागींचा नाशिकमध्ये आयटी पार्क व्हावे, यासाठीचा विनंती अर्ज सुध्दा शासनाकडे पाठविला होता.

नाशिक हे नाशिक-मुंबई-पुणे या सुवर्ण त्रिकोणातील एक प्रमुख शहर असून उत्तर महाराष्ट्रातील 32 टक्के आयटी क्षेत्रातील संबंधित हे हैद्राबाद, बंगलोर, पुणे आदी शहरांमध्ये नोकरी निमित्ताने जातात. आयटी क्षेत्राशी संबंधित ज्ञान घेतलेले मनुष्यबळ व पायाभूत सुविधा देखील नाशिकमध्येच सहजरित्या उपलब्ध आहे.

दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासक राजवट सुरू असल्यामुळे आयटी हब विषय बाजूला पडला होता. मनपा आयुक्तांनी पुन्हा त्याला चालना दिली असून शेतकर्‍यांशी चर्चा करून त्याबाबत माहिती घेऊन सविस्तर अहवाल शासनाकडे रावाना करण्याची तयारी सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com