भयंकर! हॉटेलच्या ४२ व्या मजल्यावरून दगड कोसळून दोघांचा जागीच मृत्यू, वाहनांचाही चुराडा
मुंबई | Mumbai
मुंबईत वरळीच्या गांधीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून अचानक मोठा दगड खाली कोसळला. त्यामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे.
इमारतीचे बांधकाम सुरू असूनही आसपासच्या भागात सुरक्षेचे उपाय करण्यात आले नव्हते. यामुळे इमारतीतून पडलेला सीमेंटचा ब्लॉक थेट नागरिकांच्या डोक्यावर पडला. धक्कादायक बाब म्हणजे सीमेंटचा ब्लॉक डोक्यावर पडून २ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती इमारतीत कोणाकडेच नव्हती. जखमी झालेले 2 जण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून होते.
या कालावधीत दोघांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जेव्हा दुर्घटना झाल्याचे कळले तेव्हा १०८ वर कॉल करून अँब्युलन्स बोलावण्यात आली आणि जखमींना नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळली होती. डॉक्टरांनी तपासणी करून दोघांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. साबीर अली ( ३६ ) आणि इम्रान अली खान ( ३० ) अशी मृताची नावे आहेत.
याआधी जानेवारी महिन्यात कर्नाटकातील बंगळुरु इथेही अशाच प्रकारची घटना घडल्याची बातमी आली होती. १० जानेवारीला कर्नाटकातील बंगळुरूमध्ये मेट्रोसाठी बांधकाम सुरू असताना खांब कोसळून एका महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. ही महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात होती, त्याच दरम्यान हा अपघात झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. ही घटना बेंगळुरूच्या नागावरा भागात घडली होती.