मुंबईत मुसळधार; पवई तलाव भरला

२४ तासांत २०० मिमी पावसाची नाेंद
मुंबईतील पाऊस
मुंबईतील पाऊस-

मुंबई

मुंबईतील कारखान्यांसाठी पाणी पुरवठा करण्यात येणारा पवई तलाव भरून वाहू लागला आहे. पालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा हा तलाव आहे.५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.

रविवारी देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच आज साडेबारा वाजता हायटाईड देखील येण्याची शक्यता आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते. मागील दोन दिवस मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. ठाण्यात दिवसभर मुसळधार पावसाने थैमान घातले. सुरुवातीला रिमझिम पडणाऱ्या पावसाने अकराच्या सुमारास जोर धरला. त्यानंतर रात्री पर्यंत संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळ पासून ते रात्रीपर्यंत पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल १८९ मिमी पावसाची नोंद केली.

राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

दक्षिण गुजरात आणि लगतच्या प्रदेशात तयार झालेल्या चक्रवाती वर्तुळाका स्थितीची तीव्रता रविवारी कमी होणार असली तरी राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, पुणे, सातारासह काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि उर्वरीत मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडू शकतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com