मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; गिरणा नदीपात्रातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; गिरणा नदीपात्रातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

नाशिक | Nashik

मुंबई पोलिसांनी ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणात नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रात मुंबई पोलिसांना मोठा ड्रग्जचा साठा आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे....

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिकच्या कारखान्यामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतून गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. त्यानंतर पोलिसांनी सचिन वाघची कसून चौकशी केली असता तपासात ही माहिती समोर आली होती. यांनतर मुबंई पोलिसांनी सचिन वाघसह नाशिकमध्ये दाखल होत मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. यावेळी पोलिसांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथक देखील दाखल झाले. त्यानंतर १५ फूट खोल नदीपात्रात मध्यरात्रीपासून शोधकार्य सुरू करण्यात आले व ते अजूनही सुरुच आहे.

दरम्यान, या शोध मोहिमेत मुंबई पोलिसांनी सचिन वाघने नदीपात्रात फेकलेल्या तब्बल दोन गोण्या ड्रग्ज जप्त केले असून या जप्त करण्यात आलेल्या ४० ते ५० किलो ड्रग्जच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १०० कोटींच्या आसपास आहे. तसेच मुंबई पोलिसांनी देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी भागातून देखील १५ किलो ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com