
मुंबई | Mumbai
पंतप्रधान मोदींसह देशातील महत्वाच्या राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे (Death Threats) फोन येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून कामाला लागल्याचे दिसत आहे. अशातच आता मुंबईसह (Mumbai) पुणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांना फोनवरून देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिस कंट्रोल रूममध्ये (Mumbai Police Control Room) फोन केला होता. त्यावेळी त्याने म्हटले की, शनिवार (दि.२४) रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात (Andheri and Kurla Areas) बॉम्बस्फोट (Bombing) होणार आहेत.
तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने पुढे बोलताना पोलिसांना सांगितले की, आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच, पुण्यातही (Pune) बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणत आहे, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
त्यानंतर पोलिसांनी याबाबतचा अधिक तपास केला असता कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जौनपूर येथून केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याप्रकरणी अंबोली पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०५ (१) (बी), ५०५ (२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांच्या (UP Police) मदतीने धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले असून त्याचे फोन करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच संशयित आरोपीची वेगवेगळी नावे असून तो पोलिसांना त्याचे खरे नाव सांगत नसल्याची माहिती समोर आली आहे.